esakal | शेतकरी आंदोलनात मोदी सरकारविरोधात वाजपेयींच्या VIDEO चा 'उतारा'
sakal

बोलून बातमी शोधा

atal bihari vajpeyi old video

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आणि विरोधावरून सोशल मीडियावर वादही सुरु झाला आहे. दरम्यान आता सरकारविरोधात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाच व्हिडिओ शेअर केला जात आहे.

शेतकरी आंदोलनात मोदी सरकारविरोधात वाजपेयींच्या VIDEO चा 'उतारा'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागल्यानंतर सरकारने विरोधकांवर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला होता. तसंच शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आणि विरोधावरून सोशल मीडियावर वादही सुरु झाला आहे. दरम्यान आता सरकारविरोधात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाच व्हिडिओ शेअर केला जात आहे.

सरकारचा विरोध करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेचा उल्लेख करत वाजपेयी तत्कालीन सरकारला इशारा देत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू नये असं वाजपेयी यांनी त्यात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी वाजपेयींच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला. भूषण यांनी म्हटलं की, भाजपच्या भक्तांनी वाजपेयी यांचे 1980 चे भाषण ऐकावे. त्यात शेतकरी आणि त्यांच्यावर सरकारच्या अत्याचाराबाबत बोलले आहेत. 

व्हिडिओमध्ये वाजपेयी यांनी एमएसपी वरून तत्कालीन सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी सरकारवर आरोप केला होता की, सरकारने दर निश्चित केला पण खरेदीची व्यवस्था नाही. राजकारण फक्त खुर्चीचा खेळ राहू नये. मात्र काही वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. तर कपड्यांची किंमत तीनपट वाढली आहे. लहान शेतकऱ्यांना उत्पादीत माल लवकर विकावा लागतो. ते घरी ठेवू शकत नाहीत. त्यामुळे मिळेल त्या दराला त्यांना विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिघडत आहे. 

हे वाचा - Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

वाजपेयींनी पुढे म्हटलंय की, फक्त महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजारतमध्ये शेतकरी न्यायासाठी लढत आहेत. शेतकऱ्यांवर दबाव टाकणं सोडून द्या. त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करू नका, शेतकरी घाबरणारे नाहीत. आम्ही शेतकरी आंदोलनाचा राजकारणासाठी वापर करणार नाही. पण शेतकऱ्यांच्या योग्य मागण्यांचे समर्थन करतो. जर सरकार दबावतंत्र वापरत असेल, कायद्याचा दुरुपयोग करत असेल किंवा शांततेनं सुरु असलेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर शेतकऱ्यांच्या संघर्षात आम्हीही सहभागी होऊ. त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालू असंही ते म्हणाले होते.

हे वाचा - सचिन तू अंबानींसाठी बॅटिंग करतोयस की, संघासाठी?

सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी सीमेवर मोठं बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. रस्त्यावर चक्क खिळे ठोकून रस्ता बंद केला आहे. तसंच या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. त्यावरून देशातील अनेक मान्यवर कलाकार आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हटलं आहे. यावरूनही वातावरण तापलं आहे.