पतीचे गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून स्वत: घेतला घटस्फोट; उदार पत्नीचं सोशल मीडियावर कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

महिलेने संमजसपणा दाखवत त्या व्यक्तीसोबत घटस्फोट घेतला आणि त्या दोघांचे लग्नदेखील लावून दिले.

भोपाळ : विवाहबाह्य संबंधामुळे अनेकदा चांगले आणि सुखी संसार नेस्तनाबुत होतात. अशा संबंधामुळे पती-पत्नींच्या नात्यात फूट पडून विश्वास गमावला जातो, आणि सरतेशेवटी तो संसार मोडण्यात त्याची परिणीती बहुतांश वेळेला होताना दिसते. भारतात अशी अनेक प्रकरणे सर्रास दिसतात. त्यामुळे विवाहबाह्य संबंध हे चोरटेपणानेच करण्यावर अधिक भर दिला जातो. हे वास्तव आहेच, मात्र या विपरित घटना देखील समाजात घडताना दिसतात. ही घटना ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. 

हेही वाचा - मागील आठ वर्षांत देशभरातून तब्बल 4.39 कोटी बोगस रेशन कार्ड्स रद्द

ही घटना आहे भोपळमधील. तीन वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत ज्या महिलेचे लग्न झाले त्याच महिलेने आपल्या पतीचे लग्न आता त्याच्या प्रेयसीसोबत लावून देण्यास मदत केली आहे. यामुळे बरेचजण त्या महिलेचे कौतुकच करताना दिसत आहेत. झालं असं की आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पत्नीला समजलं. पतीला त्या प्रेयसीसोबत रहायचं होतं. हे समजल्यानंतर त्या महिलेने संमजसपणा दाखवत त्या व्यक्तीसोबत घटस्फोट घेतला आणि त्या दोघांचे लग्नदेखील लावून दिले. पतीला अडचणीत न आणता तिने हे कृत्य पार पाडले.

या बाबत अधिक माहिती वकीलांनी दिली. त्यांनी म्हटलं की, पती दोघींसोबतही लग्न करुन राहू इच्छित होता. मात्र, कायद्याद्वारे व्यक्तीला एकावेळी दोन महिलांसोबत लग्न करता येत नाही. मात्र, त्याची पत्नी खूप समजूतदार होती. तिने पतीसोबत घटस्फोट घेतला आणि त्याचे प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यास त्याची मदतही केली. या महिलेचे त्या व्यक्तीसोबत तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 

हेही वाचा - PUBG लव्हर्ससाठी खुशखबर; दिवाळीत होणार कमबॅक

महिलेच्या या उदार मानसिकतेबद्दल सोशल मिडीयावरुन तोंडभरुन कौतुक होत आहे. याबाबत एका ट्विटर युझरने म्हटलंय की, या महिलेचं देव भलं करो, जिने त्या व्यक्तीविरोधात कोणत्याही प्रकारची खोटी केस दाखल केली नाही. तर दुसऱ्या एका ट्विटर युझरने म्हटलं की मला पहिल्या पत्नीसाठी वाईट वाटत आहे. खरं प्रेम तर तिचंच आहे यात. याप्रकारच्या अनेक प्रतिक्रीया सोशल मीडियावर येत असून या प्रकारावर आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 3 years of marriage wife helps husband get married to his girlfriend

Tags
टॉपिकस
Topic Tags: