अनंतनाग हल्ल्यानंतर सीआरपीएफ बदलतेय व्युहरचना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

अनंतनाग हल्ल्यानंतर गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षिततेबाबत धोरणात्मक स्तरावर बदलांची शक्यता आहे. 

अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.  

राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा हल्ल्यानंतरचा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. पाच सुरक्षा रक्षकांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याच्या तपासात हाती आलेल्या माहितीप्रमाणे, स्थानिकांच्या मते हा हल्ला पाकिस्तान स्थित जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेने केला आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर येथील जवानानांच्या सुरक्षिततेबाबत मोठ्या प्रमाणात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याच्या हालचाली आहेत. 

गेल्या बुधवारी (ता. 12) काश्मीरातील अनंतनाग येथील गर्दीच्या रस्त्यावर तैनात राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर दुचाकीस्वार दहशतवाद्यांनी बंदुक ताणली. ज्यात पाच जवान हुतात्मा झाले. हा हल्ला 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतरचा दुसरा मोठा जवानांवरील थेट हल्ला आहे. 

गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, 'सीआरपीएफ जवानांवर दिवसाढवळ्या हल्ला झाला आहे. या वेळात गर्दीचा फायदा घेत जवानांवर हल्ला करणे हे सोपे आहे. कारण जवान खुल्या जागी, थेट रस्त्यावर तैनात असतात. हे बदलायला पाहिजे. जवानांना एखाद्या पोलिस स्टेशन किंवा बंदिस्त परिसरात तैनात करायला पाहिजे. जेणेकरुन दहशतवाद्यांना थेट हल्ला करता येणार नाही आणि जवानांनाही प्रतिकार करण्याची संधी मिळेल.' 

'सीआरपीएफच्या जवानांना सामान्य लोकांपासून दूर ठेवायला हवे. विशेषतः जेव्हा स्थानिक पोलिसांना मदतीची गरज पडते तेव्हा हे जवान उपलब्ध होऊ शकतील, अशी सोय व्हायला हवी. जेणेकरुन अशा हल्ल्यांनाही बळी पडण्याची शक्यता कमी होईल.' असे देखील गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

सीआरपीएफचे मुख्य निर्देशक राजीव राय भटनागर यांनी केंद्रिय गृह सचिव राजीव गोबा यांना सांगितल्याप्रमाणे, 'पुलवामा आत्मघाती हल्ल्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. अनंतनाग येथे झालेला हल्ला ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण महामार्गापासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी देखील सुरक्षा कडक नसल्याने दहशतवाद्यांना महामार्गावरुन थेट घुसता आले.' या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये येणाऱ्या अमरनाथ यात्रेतील सुरक्षेबाबतही चर्चा झाली. 

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान हुतात्मा

तसेच, गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, 'अनंतनाग येथील हल्ल्याची जबाबदारी घेतलेली अल्-उमर-मुजाहीद्दीन संघटना कार्यशील नाही. ही संघटना केवळ जैश-ए-महंम्मदच्या आदेशांचे पालन करत आहे. जैशमुळे पाकिस्तानची जगात खूप बदनामी झाली आहे, म्हणून मुजाहीद्दीनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.'

सध्या जम्मू-काश्मीरात दहशतावाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु ठेवले आहेच. शिवाय दहशतवाद प्रभावी परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठीही सीआरपीएफ स्थानिक पोलिसांची मदत करते आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Anantnag terror attack CRPF may change J and K deployment pattern