अण्णा हजारे 'भाजपचे एजंट'; 'आप'च्या सिसोदिया यांची टीका

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

'आप'ला दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण त्यांची विश्‍वासार्हता ढासळली. कोणत्याही सरकारी सुविधा वापरणार नाही, असे आश्‍वासन अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान दिले होते. तरीही वाढवून घेतलेला पगार, मोठमोठे बंगले यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्‍वास राहिला नाही

नवी दिल्ली :  सातत्याने होत असलेल्या पराभवमुळे हताश झालेल्या 'आम आदमी पक्षा'च्या (आप) नेत्यांची निराशा आता ट्‌विटरवरून झळकू लागली आहे. पक्षाच्या उतरंडीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या मनीष सिसोदिया यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरच निशाणा साधला. अण्णा हजारे यांना 'फ्रॉड' म्हणणाऱ्या काही ट्‌विट्‌स सिसोदिया यांनी 'रि-ट्‌विट' केली. त्यावरून वाद निर्माण होताच 'माझे अकाऊंट हॅक झाले' अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न सिसोदिया यांनी केली. 

अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या 'जनलोकपाल' आंदोलनातून 'आप'ची स्थापना झाली. राजकीय पक्षाची स्थापना झाल्यानंतर हजारे यांना पक्षामध्ये विशेष स्थान नव्हते. आता सलग पराभवांची मालिका पाहून हताश झालेल्या 'आप'च्या नेत्यांनी हजारे यांना 'भाजपचे एजंट' म्हणण्यास सुरवात केल्याचे सिसोदिया यांच्या ट्‌विटर टाईमलाईनवरून दिसून येते. 

 

दिल्लीतील महापालिका निवडणुकीत 'आप'चा दारूण पराभव झाल्यानंतर हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, की ''आप'ला दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण त्यांची विश्‍वासार्हता ढासळली. कोणत्याही सरकारी सुविधा वापरणार नाही, असे आश्‍वासन अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान दिले होते. तरीही वाढवून घेतलेला पगार, मोठमोठे बंगले यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्‍वास राहिला नाही.' दिल्लीतील पराभवानंतर 'आप'ने 'इव्हीएम'वर खापर फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण यावरही अण्णा हजारेंनी टीका केली होती. 

यानंतर 'आप'च्या समर्थकांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका सुरू केली होती. यातीलच काही ट्‌विट्‌स उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी रि-ट्‌विट केल्याने वादाला तोंड फुटले. यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना 'कुणीतरी माझे ट्‌विटर अकाऊंट हॅक केले. अण्णा हजारे यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. त्यांच्याविरुद्ध मी अशी टीका कधीच करू शकणार नाही. अशा पोस्टवर कृपया विश्‍वास ठेवू नये,' असे सिसोदिया म्हणाले.

Web Title: After calling Anna Hazare 'BJP agent', Manish Sisodia claims his twitter account was hacked