पतीचा फोनवरून 'तलाक'; सासरच्यांनी केला 'ऍसिड हल्ला'

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

पिलभीत येथील एका महिलेला परदेशात असलेल्या तिच्या पतीने काही वर्षांपूर्वी फोनवर तलाक दिला होता. मात्र तिने पतीचे घर सोडण्यास नकार दिल्याने सासरकडच्यांनी तिच्यावर 'ऍसिड हल्ला' केला आहे.

पिलभीत : मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदीबाबत वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तोंडी तलाक दिल्याचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. पिलभीत येथील एका महिलेला परदेशात असलेल्या तिच्या पतीने काही वर्षांपूर्वी फोनवर तलाक दिला होता. मात्र तिने पतीचे घर सोडण्यास नकार दिल्याने सासरकडच्यांनी तिच्यावर 'ऍसिड हल्ला' केला आहे.

येथील एका 40 वर्षांच्या महिलेचा अठरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर पतीच्या नोकरीच्या निमित्ताने ते दोघेही काही वर्षे अमेरिकेत होते. मात्र 2011 साली भारतात परतल्यावर त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यानंतर पुन्हा न्युयॉर्कमध्ये नवी नोकरी मिळाल्याचे सांगत पती भारताबाहेर निघून गेला. काही दिवसातच त्याने तिला फोनवर तलाक दिला. मात्र पीडित महिलेने असा तलाक स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान पतीचे घर सोडावे म्हणून सासरकडच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. नुकताच त्यांनी तिच्यावर ऍसिड हल्ला केला आहे.

"त्यांनी जे काही केले आहे त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. मला त्यांना तुरुंगात पाठवायचे आहे', अशा प्रतिक्रिया पीडित महिलेने दिल्या आहेत. "तिच्या शरीरावर भाजल्याच्या जखमा आहेत. आम्ही वैद्यकीय अहवालाच्या प्रतिक्षेत आहोत', अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: After triple talaq, woman attacked with acid by in-laws