देशभर जनक्षोभ; पोलिसांची धरपकड सुरूच!

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले.

नवी दिल्ली : ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमध्ये पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज देशातील बारा राज्यांना आपल्या कवेत घेतले. पोलिसांनी कडक भूमिका घेत देशभरात दीड हजाराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.

देशभरातील या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या आंदोलनामुळे सरकार काहीशी नमती भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करेल; पण तुकडे तुकडे गॅंगशी नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले, तर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठांना राजकारणापासून दूर ठेवावे, असे मत मांडले. दिल्लीत आज काही भागांमधील मेट्रोसेवा, तसेच इंटरनेट सेवा थांबविण्याची वेळ आली. 

सामाजिक संघटनांची निदर्शने रोखण्यासाठी लालकिल्ला परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता. हा आदेश झुगारून निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

उत्तर आणि मध्य दिल्लीतील वॉल सिटी भाग, मंडी हाउस परिसर, हिंसाचाराची झळ बसलेला सीलमपूर, जामियानगर आणि शाहीनबाग परिसर, तसेच बवाना या भागांमधील एसएमएस, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. 

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

दरम्यान, आंदोलकांना जमा होता येऊ नये यासाठी जनपथ, जामा मशीद, लालकिल्ला, विद्यापीठ, दिल्ली गेट, बाराखंबा रोड, पटेल चौक, लोककल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट, मंडी हाउस, सर्वाधिक वर्दळीचे केंद्र असलेले राजीव चौक मेट्रो स्थानक आदी १९ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. यातील काही नंतर सुरूही करण्यात आली.

गुहा, यादव पोलिसांच्या ताब्यात
नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही आंदोलन झाले. कर्नाटकात हुब्बाली, कलबुर्गी, हसन, म्हैसूर आणि बळ्ळारीत तीव्र आंदोलन झाले. बंगळूरमधील टाउन हॉल परिसरात आंदोलन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा आणि दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बुद्धिवंतांच्या वर्तुळातून याचा निषेध होऊ लागला आहे. 

मेघालयात ‘इनर लाइन परमिट’
विधिमंडळाने आज राज्यामध्ये इनर लाइन परमिट लागू करावे अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. या घटनेच्याविरोधात राज्यामध्ये कोणतेही हिंसक पडसाद उमटू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील गृहविभाग परिस्थितीचा फेरआढावा घेत नाही, तोपर्यंत राज्यातील इंटरनेट सेवा बंदच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र

‘यूपी’त तुफान धुमश्‍चक्री
‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणांवर झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. संभळमध्ये आंदोलकांनी बसची जाळपोळ केली. लखनौमध्ये पोलिस आणि आंदोलकांत जोरदार चकमक झाली. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या वेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. लखनौतीलच ठाकूरगंज, हसनगंजसह सहा ठिकाणांवर मोठा हिंसाचार झाला. मधेगंजमध्ये आंदोलकांनी पोलिस चौकीला आग लावली. ठाकूरगंजमध्येच एका वृत्तवाहिनीची ओबी व्हॅनही जाळण्यात आली. हजरतगंजमधील मुख्य चौक ते जुने लखनौ या भागामध्ये हजारो लोक रस्त्यांवर उतरले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन हजार लोकांना ताब्यात घेतले असून, ६५ पेक्षा अधिक लोकांना थेट अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation in the against Citizenship Law