शुल्कवाढीविरोधात ‘जेएनयू’मध्ये आंदोलन

पीटीआय
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

मनुष्यबळ राज्यमंत्री सहा तास अडकले
पदवीप्रदान समारंभाला उपराष्ट्रपतींबरोबर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ हे उपस्थित होते. कार्यक्रम संपताच नायडू निघून गेले आणि काही मिनिटांमध्येच विद्यार्थी कार्यक्रमस्थळी धडकले आणि पोखरीयाल अडकून पडले. आंदोलनामुळे सहा तास त्यांना बाहेर पडताच आले नाही. त्यांचे दोन पूर्वनियोजित कार्यक्रमही रद्द करावे लागले. पोखरीयाल यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन दिले. विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदेशकुमार हे समोर न आल्याने आंदोलकांनी त्यांच्या नावाने ‘चोर चोर’च्या घोषणा दिल्या.

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी आज शुल्कवाढीविरोधात आंदोलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या ‘विद्यार्थीविरोधी’ धोरणाविरोधात घोषणा दिल्या.

‘जेएनयू’च्या पदवीप्रदान समारंभासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू विद्यापीठापासून तीन किमी अंतरावर असलेल्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशनच्या इमारतीमध्ये आले होते. आंदोलनकर्त्या शेकडो विद्यार्थ्यांनी या इमारतीकडे मोर्चा वळविला. त्यांना अडविण्यासाठी पोलिसांनी उभ्या केलेल्या बॅरिकेड्‌सचा अडथळा त्यांनी जोर लावून बाजूला केला. या विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर केला.

काही आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शुल्कवाढीच्या माध्यमातून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा विद्यार्थी संघटनेने आरोप केला आहे. 

महिलांचे राजकीय सबलीकरण आवश्‍यक
पदवीप्रदान समारंभात बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी महिलांच्या राजकीय सबलीकरणाची आवश्‍यकता व्यक्त केली. महिलांना संसद आणि विधिमंडळांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व देऊन हे सबलीकरण करता येईल, असे ते म्हणाले. भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र म्हणून पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आणण्याची हीच वेळ असल्याचेही नायडू म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation jnu for free increase oppose