esakal | कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

punjab suicide

कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे.

कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदीगढ - केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणणार आहे. या विधेयकांना लागू करू नये यासाठी शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. दरम्यान, यामध्ये आता एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घराबाहेर एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्यानं खळबळ उडाली आहे. बादल गावातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्यानं त्या शेतकऱ्याला साथीदारांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं आहे. 

का होतोय कृषी विधेयकाला विरोध, पहा हा व्हिडीओ...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्यानं विष प्यायल्याचं सहकाऱ्यांना सांगितलं. तेव्हा तात्काळ अँब्युलन्स बोलावण्यात आली आणि याची माहिती तिथं तैनात असलेल्या पोलिसांनाही दिली. पोलिसांनीच शेतकऱ्याला रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केलं. संबंधित शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजते. पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री बादल यांच्या घराबाहेर गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 

अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयकं आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. ही विधेयकं सोमवारी लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या विधेयकाची गरज बोलून दाखवली होती. पण सरकारने मांडलेली ही सगळी विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातील आहेत, असं शेतकऱ्यांचं आणि विरोधी पक्षाचं म्हणणं आहे.सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून विरोध होतोय. देशभरातल्या शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि हरियाणातले शेतकरी या नवीन विधेयकांना सर्वात जास्त विरोध करत आहेत.