शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नाची माहितीच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 6 February 2021

शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा मोदी सरकारने केली असली तरी, शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचा नेमका तपशीलच सरकारकडे उपलब्ध नाही.

नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा मोदी सरकारने केली असली तरी, शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचा नेमका तपशीलच सरकारकडे उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती खुद्द कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली आहे. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टांबाबत लोकसभेमध्ये उपस्थित प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही कबुली दिली. २०१५-१६ पासून आतापर्यंत शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाच्या तपशिलाची मागणी भाजपचे सदस्य डॉ. मनोज राजोरिया, माकपचे सदस्य ए. एम. आरिफ आणि काँग्रेसचे सदस्य राहुल गांधी यांनी केली होती. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुप्पट उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मूळ उत्पन्न नेमके किती या माहितीचाच सरकारकडे अभाव असल्याचे संसदेच्या पटलावर स्पष्ट करताना कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले, की २०१५-१६ पासून सरकारकडे कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या सरासरी मासिक उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध नाही. याबाबतचे अंतिम अध्ययन राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने (एनएसएसओ) २०१२-१३ मध्ये केले होते, असेही कृषी मंत्री तोमर यांनी उत्तरात म्हटले आहे. 

अर्थात, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विकास योजना, सुधारणा आणि धोरणांचा दाखला देताना ‘पीएम किसान योजने’द्वारे अर्थसाहाय्य केले जात आहे. याशिवाय आत्मनिर्भर भारत – कृषी योजना, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी (एआयएफ) तयार करणे या निर्णयांची पुस्तीही कृषी मंत्री तोमर यांनी जोडली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाच वर्षांपूर्वीचे उत्पन्न ८९३१ रुपये 
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने २०१२-१३ मध्ये केलेल्या अध्ययनानुसार शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे ढोबळ मासिक उत्पन्न ६४२६ रुपये होते. तर, २०१६ मध्ये नाबार्डने नाबार्ड अखिल भारतीय ग्रामीण वित्तीय समावेशकता सर्वेक्षण या नावाने एक अध्ययन केले होते. २९ राज्यांमधील ४०,३२७ शेतकरी आणि बिगर शेतकरी कुटुंबांच्या सर्वेक्षणाअंती काढलेल्या निष्कर्षात शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न ८९३१ रुपये असल्याचे म्हटले होते. मात्र, सरकारने अधिकृतपणे शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचे आकडे अद्याप जाहीर केलेले नाहीत.

'कृषी कायदे दिल्लीत नव्हे, मुंबईत तयार झाले'; दिग्विजय सिंहांचा रोख कुणाकडे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Narendra Singh Tomar income farming family