बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड; चौघांना अटक

महेश शहा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमधील दहशतवाद प्रतिबंध पथकाने (एटीएस) बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गुजरात व मुंबईमध्ये हे बनावट पासपोर्टचे रॅकेट चालविले जात असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानंतर कारवाई करत अहमदाबाद, दमण, पोरबंदर व मुंबई अशा शहरांतून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांकडून दहा पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

गुजरात एटीएसच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत गुजरातमधील सर्वांत मोठा पासपोर्ट गैरव्यवहार असण्याची शक्‍यता आहे. बनावट पासपोर्टप्रकरणी अहमदाबाद येथून जीतू पटेल याला अटक केली असून, तो या टोळीचा म्होरक्‍या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बनावट पासपोर्टच्या साहाय्याने प्रवाशांना पोर्तुगाल सोडणे व तेथून अवैध मार्गाने ब्रिटनला नेण्याचे काम ही टोळी करत होती. अहमदाबादहून पटेल या टोळीचे काम पाहत होता. पटेलने दिलेल्या माहितीवरूनच त्याच्या इतर तीन साथीदारांना दमण, पोरबंदर व मुंबई येथून अटक करण्यात आल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांमध्ये बनावट पासपोर्टच्या साहाय्याने जे लोक अवैधरीत्या ब्रिटनमध्ये स्थलांतरित होण्यास इच्छुक आहेत, त्यांना मदत केली जात होती. अशा लोकांकडून एका पासपोर्टसाठी 25 ते 30 लाख रुपये घेतले जायचे. बनावट पासपोर्ट दलाल स्थलांतरासाठी इच्छुकांचे फोटो पोर्तुगालच्या व्हिसावर चिकटवून त्यांना पोर्तुगालला पाठवत व तेथून ब्रिटनला नेण्यात येई. बनावट पासपोर्ट प्रकरणातील दलालांकडून बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत. तसेच पोर्तुगाल सरकारलाही याबाबत कळविण्यात आले आहे.

Web Title: ahmedabad news fake passport four arrested