काँग्रेसला "हार्दिक' शुभेच्छा!

काँग्रेसला "हार्दिक' शुभेच्छा!

अहमदाबाद : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेले चार दिवस दिल्लीत गुंतून पडलेले असताना, इकडे गुजरातच्या रणधुमाळीत काँग्रेसला बळ देण्याचे काम "पाटीदार अनामत आंदोलन समिती'चा अवघ्या 24 वर्षांचा नेता हार्दिक पटेल याने एकट्यानेच सुरू ठेवले आहे. त्यामुळेच हार्दिक जेथे कोठे सभा घेत आहे, तेथे लगेच जाऊन त्यास उत्तर देण्याचे काम थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातीने करावे लागत असल्याचे गुजरातच्या चार दिवसांच्या फेरफटक्‍यात दिसून येत आहे.

राजकोट असो की जुनागढ, हार्दिकला मिळत असलेला मोठ्या प्रतिसादानंतर लगोलग मोदी यांनी तेथे जाणे भाग पडल्यामुळे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मात्र, हार्दिकच्या सभांना प्रचंड गर्दी होत असली, तरी तो स्वत:हून थेट काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत नाही. भारतीय जनता पक्ष तसेच आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांना मतदान करावयाचे नाही, एवढेच तो सांगतो आणि "मग कोणाला मतदान करणार?' असा प्रश्‍न विचारतो. सुरतच्या महाप्रचंड मेळाव्यात हा प्रश्‍न विचारल्यावर लोकांनी "काँग्रेस... काँग्रेस...' असा आवाज लावला. तेव्हा "तुम्ही तसा निर्णय घेतलाच असेल, तर मी तुमच्याच बरोबर आहे...' असे त्याने सांगितले आणि त्यास उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

काँग्रेसचा असाही फायदा
हार्दिकबरोबरच काँग्रेसची भिस्त ही दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांच्यावर असली, तरी जिग्नेश हा वडगाम आणि अल्पेश हा राधनपूर या आपापल्या विधानसभा मतदारसंघांतच अडकून पडले आहेत. वय अवघे 24 असल्यामुळे हार्दिकला निवडणुकीस उभे राहता आलेले नाही आणि काँग्रेससाठी ही मोठीच फायद्याची गोष्ट ठरू पाहत आहे. त्यामुळेच पटेलांच्या प्रभावक्षेत्रात, भाजपविरोधात रान उठवत काँग्रेसला "हार्दिक शुभेच्छा' देण्याचे काम त्याने जोमाने सुरू ठेवले आहे.

माध्यमांचे दुर्लक्ष
हार्दिक पटेलला गुजरातभर प्रचंड प्रतिसाद मिळत असला, तरी मोदी यांची प्रत्येक सभा "लाइव्ह' करणारे कोणतेही गुजराथी चॅनेल हार्दिकला "लाइव्ह' तर सोडाच, त्याच्या सभेचे वार्तांकनही करत नाहीत. "सत्ताधाऱ्यांचा या गुजराथी चॅनेलवर किती दबाव असणार, तेच यामुळे दिसून येत आहे,' असे ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक डॉ. हरी देसाई यांनी बोलून दाखवले. शिवाय, भाजपला 125 जागा मिळतील, असे भाकित करणाऱ्या एका राष्ट्रीय चॅनेलला आता अखेर तो आकडा 95 पर्यंत खाली आणावा लागला आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com