आता कराडिया राजपूत समाजाचा भाजपला इशारा

महेश शहा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद : गुजरात विधानसभेमध्ये दीडशेहून अधिक जागा मिळविण्याचा भाजपने चंग बांधला असला, तरी सध्या राज्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाटीदार नेते फोडण्याचा आरोप नुकताच झाल्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्याविरोधात कराडिया राजपूत समाजाने निदर्शने सुरू केली आहेत. वाघानी यांना हटवा, अन्यथा निवडणुकीत भाजपला मते देणार नाही, असा इशारा या समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.

वाघानी यांच्याविरोधात भावनगर जिल्ह्यात कराडिया राजपूत समाजाने नुकत्याच काढलेल्या मोर्चामध्ये जवळपास एक लाख जणांनी सहभाग घेतला होता. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या वाघानी यांनी राजीनामा द्यावा, अशी या समाजाची मागणी आहे. वाघानी यांनी मोक्‍याच्या जागी असलेली, 25 कोटी रुपये मूल्य असलेली कुरणाची जमीन बळकावली असून, त्यांच्या या कृतीला विरोध करणाऱ्या बुधेल गावच्या माजी सरपंचाला दमबाजी केल्याचा कराडिया राजपूत समाजाचा आरोप आहे. बुधेल गावचे माजी सरपंज दानसांग मोरी हे कराडिया रजपूत समाजाचे आहेत. राजकीय प्रभावाचा फायदा घेत वाघानी यांनी मोरी यांच्यावर बनावट गुन्हे दाखल करत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे या समाजाचे नेते कंभा गोहिल यांचे म्हणणे आहे.

"आमच्या नेत्याविरोधात सत्तेचा गैरवापर आम्ही सहन करणार नाही. भाजपने वाघानी यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपविरोधात मतदान करू,' असा इशारा गोहिल यांनी समाजाच्या महासंमेलनात दिला आहे. आमच्या समाजाचा 75 मतदारसंघांवर प्रभाव असून, किमान 25 जागा केवळ आमच्या बळावर निवडून येऊ शकतात, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

Web Title: ahmedabad news Gujarat Legislative Assembly election and jitu waghani