esakal | 'कोरोनाबाबत लोकांचा हलगर्जीपणा भोवला'; AIIMS चे प्रमुखांनी व्यक्ती केली भीती

बोलून बातमी शोधा

randeep guleria

आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात एक लाख ६८ हजार ९१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

'कोरोनाबाबत लोकांचा हलगर्जीपणा भोवला'; AIIMS चे प्रमुखांनी व्यक्ती केली भीती
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली  ः भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणावर प्रसारास सुरवात केली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्यात तर कोरोनाची सर्वाधिक दैनंदिन आकडेवारी ही छातीत धडकी भरावी अशीच आहे. देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचं चित्र आहे. देशात सध्या लशीकरणाची मोहीम सुरु असली तरीही कोरोनाचा संसर्ग काही कमी होताना दिसत नाहीये. लोकांकडून होणारे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन आणि सर्वाधिक संसर्गजन्य अशा ‘सार्स-कोव्ह-२’ या विषाणूचा प्रसार यामुळे देशातील संसर्ग वाढला असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. या संसर्गाला येथेच रोखण्यात आले नाही तर देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Corona Updates: कोरोनाचं 'रौद्ररुप'; २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण​

स्थानिक पातळीवर देखील लोकांनी कोरोनाविषयक नियम पाळावेत म्हणून प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असताना लोकांनीही नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. कोरोनाचा विषाणू निष्क्रीय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. लोक या संसर्गाला फारच हलकेपणाने घेऊ लागले आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला मार्केटयार्ड, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्स गर्दीने खचाखच भरलेले दिसतील. या सगळ्या गोष्टी विषाणूसाठी सुपरस्प्रेडर ठरल्या आहेत. आता एका व्यक्तीपासून अनेकांना संसर्ग होण्याचे प्रमाण देखील लक्षणीयरित्या वाढले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णवाढीचा रविवारी (ता.११) नोंदवला गेलेला उच्चांक सोमवारी (ता.१२) मोडीत काढला आहे. गेल्या २४ तासातील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, हे आकडे पाहून मनात नक्कीच धडकी भरेल. रविवारी दीड लाखाचा आकडा ओलांडल्यानंतर आता त्यात आणखी सतरा हजार रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तमिळनाडूसारख्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात एक लाख ६८ हजार ९१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल ९०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षातील एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे.