... त्यांना दहशतीत रहावेच लागेल, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांचा पाकला इशारा

वृत्तसंस्था
Monday, 18 May 2020

जर भयमुक्त व्हायचे असेल तर पाकिस्तानने भारतातील दहशतवादी कृत्ये थांबवावीत, अशा शब्दांत भदोरिया यांनी पाकवर शाब्दिक तोफ डागली आहे.

नवी दिल्ली : भारतातील दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानशिवाय अन्य कुणाचाही हात असू शकत नाही, अशा आशयाचे विधान भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी केले आहे. जेव्हा-जेव्हा भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ला होईल तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला दहशतीत रहावे लागेल. जर भयमुक्त व्हायचे असेल तर पाकिस्तानने भारतातील दहशतवादी कृत्ये थांबवावीत, अशा शब्दांत भदोरिया यांनी पाकवर शाब्दिक तोफ डागली आहे. पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळावर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर 24x7 सज्ज आहे, असेही त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले.  

युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश

काश्मीर खोऱ्यातील हंदवाडा हल्ल्यानंतर भारताकडून हवाई हल्ला होईल, याची धास्ती पाकिस्तानने घेतली आहे. परिणामी पाकसेना भारतीय हवाई सेनेच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. याच पार्श्वभूमीवर भदोरिया यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भदोरिया म्हणाले की, जेव्हा भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ला होईल तेव्हा पाकिस्तानला प्रतिहल्ला होईल याची भिती असलीच पाहिजे. जर त्यांना हे भय दूर करायचे असेल तर त्यांनी भारतात दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवावे.   

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक

मे च्या पहिल्या आठवड्यात कर्नल आशुतोष शर्मांसह तीन अन्य लष्करी जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. त्यानंतर  बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे भारताकडून प्रतिहल्ला होईल, याची पाकला धास्ती वाटत आहे. पाक हवाई सेनेने रात्रीनंतर हवाई क्षेत्रातील निगरानी वाढवली आहे. मागील वर्षीच्या 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकमध्ये घुसून दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती.   

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण... 

भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदोरिया यांनी लडाखमध्ये चीनकडून होणाऱ्या अतिक्रमणावरही भाष्य केले. या भागात काही हालचाली सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. सीमाभागत घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करणे गरजेचे असते. तूर्तास हा विषय चिंता करण्यासारखा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत लदाखच्या चीनलगतच्या सीमारेषेवर चीनकडून काही हालचाली सुरु असल्याचे समोर आले होते. सिक्कीम सीमारेषेवर भारतीय लष्कर आणि चीनी लष्करामध्ये झालेल्या चकमकीनंतर चीनकडून लडाखच्या सीमारेषेवर हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते.  चीनी लष्कराची हेलिकॉप्टर्स  लडाखच्या सीमारेषेच्या अगदी जवळून फिरत आल्याचा प्रकार दिसून आला होता. त्यानंतर भारतीय हवाई दलाकडून याठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: air force chief rks bhadauria says indian army 24x7 ready for action on terrorist camp in pok