"शस्त्रसज्ज विमानांसोबत कुशल सैनिक घडविण्यावरही हवाई दलाने भर दिलाय"

भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम (व्ही आर) चौधरी यांनी ‘सकाळ'ला दिली खास मुलाखत.
Air Force Chief VR Chaudhary
Air Force Chief VR Chaudharysakal
Summary

भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम (व्ही आर) चौधरी यांनी ‘सकाळ'ला दिली खास मुलाखत.

नवी दिल्ली - 'भविष्यकाळातील युध्दांमध्ये सायबर,अंतरिक्ष तंत्रज्ञान तसेच ड्रोन प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत जाणार आहे. भारतीय हवाई दलाने (आयएएफ) आपल्या ताफ्यात नवनवीन शस्त्रसज्ज विमानांची भर घालण्याबरोबरच या नव्या ‘युध्द-तंत्रां‘साठी कुशल हवाई सैनिक घडविण्यावरही भर दिला आहे. हे करताना रडार प्रणाली, लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स आदींवरील विदेशी अवलंबित्व कमी कमी करत नेण्याचेही उद्दिष्ट हवाई दलाने समोर ठेवले आहे. हवाई दलाच्या गरजा जास्तीत जास्त देशांतर्गत क्षमतांचा विकास करूनच भागविण्याचा आमचा निर्धार आहे, `असे भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम (व्ही आर) चौधरी यांनी ‘सकाळ' ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.

जगातील चोथ्या शक्तीशाली अशा हवाई दलाच्या प्रमुख पदाची सूत्रे एअर चीफ मार्शल चौधरी यांनी नुकतीच स्वीकारली. सकाळ शी संवाद साधताना ते म्हणाले की उपग्रह यांसारख्या साधनांचाही उपयोग आमच्या सैन्याच्या मजुतीसाठी करून घेणे आता आवश्यक बनले आहे. भविष्यातील युध्दांवेळी , आमची अंतरिक्ष शक्ती किती मजबूत आहे यावर विजय-पराजयाचे गणित बव्हंशी अवलंबून राहणार आहे. आपल्या देशाच्या परिस्थितीला अनुकूल राहण्यासाठी व उपखंडातही 'दखल घेण्यासारखी शस्त्रसज्ज शक्ती' हा लौकिक कायम ठेवण्यासाठी हवाई दल आधुनिकीकरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने आपल्या ताफ्यात अत्याधुनिक उपकरणे समाविष्ट करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. पुढील दशकात हवाई दलाचे मुख्य उद्दिष्ट असेल ते ‘आत्मनिर्भरतेचे‘. विदेशी स्त्रोतांसह विदेशी उपकरणावरील अवलंबित्व कमी- कमी करत नेणे व सरकारच्या आत्मनिर्भरता, स्वदेशीकरण आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांना पूरक साथ देणे. यामुळे देशांतर्गत एरोस्पेस उद्योगाला चालना मिळेल असेही चौधरी म्हणाले.

त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी -

गेल्या १०० दिवसांहून जास्त काळ चाललेल्या रशिया-युक्रेन युध्दाकडे हवाई दलप्रमुख म्हणून आपण कसे पाहता?

चौधरी - होय. रशिया-युक्रेन संघर्ष आता जवळपास तीन महिन्यांहून जास्त काळ लांबला आहे. या संघर्षात माहिती युद्ध, सायबर डोमेन तसेच ड्रोनचा वाढता वापर होत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी आधुनिक काळातील छोट्या छोट्या आणि जलदगती युद्धांची लोकप्रिय समजूतही या लांबलेल्या युध्दाने नाकारली गेली आहे. युध्द कोणत्याही देशांत चालेलले असो, त्यातून शिकण्यासारखे बरेच धडे असतात. मात्र प्रत्येक देशाची भौगोलिक-राजनैतिक परिस्थिती वेगवेगळी असते आणि ती सातत्याने बदलत असते. देशाची संरक्षण प्रणाली, अर्थव्यवस्था आणि परकीय संबंध यांसह अनेक देश आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणांना हेच भू-राजकीय परिदृश्य बारकाईने पहाणे आणि नजीकच्या काळातील संभाव्य धोके हाताळण्यासाठी स्वतःला सात्त्याने विकसित व अनुकूल करणे आवश्यक असते. म्हणूनच मी म्हणतो की आपल्या परिस्थितीची तुलना इतर कोणत्याही देशाबरोबर करणे दिशाभूल करणारे असू शकते. त्याच वेळी जगात अन्यत्र चाललेले सशस्त्र संघर्ष आणि स्पर्धा यांचेही बारकाईने निरीक्षण करणे सुरू ठेवले पाहिजे. सध्याचा संघर्ष हा ‘हवाई क्षेत्रावर‘वर नियंत्रण मिळविण्याची अटळ आवश्यकता अधोरेखित करताना दिसतो आणि आयएएफचे त्या पैलूकडेही लक्ष आहे.

भारतासाठीचे भविष्यातील संभाव्य संघर्ष व अडथळे यादृष्टीने हवाई दलाची काय तयारी आहे?

चौधरी - हवाई दलाकडे सध्या 1400 हून जास्त विविध प्रकारच्या विमानांचा ताफा आहे. लढाऊ. विमाने, क्षेपणास्त्रे, शस्त्रास्त्रे, सेन्सॉर्सचे स्वदेशी करण त्याचबरोबर वर्तमान आणि नवीन आघाड्यांवर शस्त्रास्त्रांचे एकत्रीकरण करून हवाई दलाने आपली आक्रमणाची ‘धार' अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. हवाई दलाची क्षमता, रचना या गोष्टी सतत संवाद प्रक्रिया (नेटवर्किंग) आणि स्वयंसिध्दता (ऑटोमेशन) यांच्या सहाय्याने वाढविलेल्या आहेत. आम्ही युद्धांच्या बदलत्या स्वरूपाची जाणीव ठेवली पाहिजे. ड्रोन व काउंटर ड्रोन प्रणालीसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश हवाई दलाच्या ताफ्यात केला जात आहे. मानव-मानवरहित तंत्रज्ञानाचा सांघिक समन्वय यासारख्या सारख्या भविष्यातील युद्ध संकल्पनांचाही हवाई दल पाठपुरावा करत आहे. क्वांटम तंत्रज्ञान आणि ध्वनीपेक्षा वेगवान (हायपरसॉनिक) लढाऊ विमाने व प्रगत शस्त्रास्त्रे यांचा सतत विकास करणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दलाचे पुढच्या ५ ते १० वर्षांतील चित्र तुम्ही कसे पहाता ?

चौधरी - मिग २१ आणि मिग २७ विमाने हवाई दलाच्या ताफ्यांमधून बाहेर पडल्यामुळे आपली ताकद अलिकडच्या वर्षांत किंचित घटली आहे. मात्र राफेल, व्देशी बनावटीचे तेजस आणि हलकी लढाऊ विमाने (एलसीए) यांच्या समावेशामुळे त्याचे परिणाम अंशतः कमी झाले आहेत. पुढच्या १० ते १५ वर्षांत हवाई दलाच्या ताफ्यात एमआरएफ तसेच स्वदेशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानांचे (एलसीए) सुधारित प्रकार टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याची योजना आहे. शिवाय, स्वदेशी लढाऊ हवाई प्रणाली विकसित करण्यासाठी डीआरडीओ बरोबर हवाई दल सतत समन्वय साधत आहे. अलीकडच्या काळात सी-१७ व सी १३०-जे यासारखी अत्याधुनिक मालवाहतूक विमाने वायूदलाच्या ताफ्यात आली आहेत. एव्ह्रोच्या विमानांना पर्याय म्हणून ५६ सी-२९५ या प्रकारची विमाने खरेदी करण्याचा करार नुकताच झाला आहे.

चिनूक आणि अपाचे या सारखी अत्याधुनिक हेलिकॉप्टर याआधीच हवाई दलात समाविष्ट करण्यात आली आहेत. नजिकच्या काळात एलएएच व एलयूएच प्रकारातील आणखी स्वदेशी हेलिकॉप्टर्सही हवाई दलात दाखल होण्याच्या मार्गावर आहेत.एक स्वायत्त, सुरक्षित आणि वस्तुस्थितीजन्य माहितीच्या देवाणघेवाणीसाठी पूरक असे नेटवर्र्क उभे करण्यावर हवाई दलाचा भर आहे. संरक्षण दलाची डीआरडीओ आणि इस्त्रो यांच्या क्षमतांचे एकत्रीकरण आमची सैन्य शक्ती आणखी मजबूत करेल. त्यामुळे क्षेपणास्त्र संरक्षक रडार, अंतरिक्ष तंत्रज्ञानावर आधारित सेन्सर प्रणाली आणि देशासाठी धोकादायक ठरणाऱया अवकाशातील गोष्टींचा छडा लावण्यासाठी च्या ‘ऑप्टिकल टेलिस्कोप' यासारख्या प्रणालींचा विकास अशा परस्पर सहकार्यामुळे शक्य होईल. नागरिक व अंतरिक्ष तंत्रज्ञान यांच्यातही ताळमेळ बसविण्यास सैन्याची अंतरिक्ष तंत्रज्ञान संस्था (डीएसए) महत्वाची भूमिका बजावेल. हवाई दलाच्या आणि अंतरिक्ष तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा एकीकृत सहयोग-सहकार्य होईल त्यावेळी शत्रूंच्या हालचाली टिपणे हवाई दलासाठी आणखी सहजशक्य होईल. त्यादृष्टीने हवाई दल रणनीती आखत आहे.

अलीकडच्या काळात विदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलाची ‘एअर लिफ्टिंग' क्षमता मोठ्या प्रमाणात वापरली गेली आहे. याबाबत भविष्यातील योजना काय असतील ?

चौधरी - अफगाणिस्तानातील संघर्षापासून युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यापर्यंत अनेक घडामोडींत हवाई दलाच्या मजबूत क्षमतेची परिणामकारकता सातत्याने दिसली आहे. याशिवाय कोविड महामारी काळातही हवाई दलाने अथक परिश्रम घेतले. विशेषतः आमच्या सी-१७ सारख्या विमानांनी यात महत्वाची भूमिका बजावली. औषधे, व्हेंटीलेटर्स व ऑक्सिजन उपकरणापासून भारतीय लसींच्या आंतरराष्ट्रीय वाहतुकी पर्यंतच्या अनेक बाबींमध्ये हवाई दलाने उल्लेखनीय योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेतही हवाई दलाने वेळोवेळी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.

हवाई दलासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या आर्थिक तरतुदीबाबत तुम्ही समाधानी आहात का ?

चौधरी - गेल्या तीन वर्षांत हवाई दलासाठीच्या आर्थिक तरतुदीत ८.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जेवढी आर्थिक तरतूद असेल त्यानुसार आमच्या गरजा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यापुढील काळात आपत्कालीन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर हवाई दलाने सरकारकडे अतिरिक्त निधीचीही मागणी केली आहे. क्षमता वृध्दीसाठी मिळालेल्या निधीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण हवाई दल प्रत्यक्षात आणत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com