1978 वांद्रे विमान दुर्घटना : वैमानिकाने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, अन् काही क्षणात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Archives
1978 वांद्रे विमान दुर्घटना : वैमानिकाने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, अन् काही क्षणात...

1978 वांद्रे विमान दुर्घटना : वैमानिकाने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, अन् काही क्षणात...

१९७१ मध्ये, एअर इंडियाने पहिलं बोईंग ७४७ हे विमान खरेदी केलं होतं. भव्य दिव्य अशा या विमानाला मौर्य शासक सम्राट अशोकाच्या नावावरून 'अशोका' असं नाव देण्यात आलं होतं. १९७० च्या दशकात एअर इंडियाने विकत घेतलेल्या महाराजा-थीम असलेल्या लक्झरीयस विमानांच्या ताफ्यातलं हे पहिलं विमान होतं. "आकाशातील राजवाडा" म्हणून या विमानाची जाहिरात केली गेली होती. या विमानाबद्दल देशभरातील लोकांना भरपुर आकर्षण होतं. जवळपास ७ वर्ष आकाशात राज्य केल्यानंतर या विमानासोबत एक मोठा अपघात (Air India Boeing 747 Ashoka Accident 1978) झाला आणि आज या विमानाची आठवण त्या दुर्घटनेसाठीच काढली जाते. १९७८ साली घडलेल्या या धडकी भरवणाऱ्या घटनेनं राज्यासह सर्व देशवासीयांना हादरवून सोडलं होतं.

१ जानेवारी १९७८ रोजी मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरून आशोकानं उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेऊन काही उंचीवर जाताच रात्रीच्या काळोखात विमान अदृष्य झालं. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान शहरालगत असलेल्या किनारपट्टीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर अरबी समुद्रात कोसळलं. एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या घटनेत तब्बल २१३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातून आणि देशभरातून हळहळ व्यक्त केली गेली.

हेही वाचा: पहिल्यांदा विमान प्रवास कराताना 'हे' लक्षात ठेवा

विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर साधारणत: ८००० फुटांवर गेल्यावर मुंबई विमानतळाच्या कन्ट्रोलर टॉवरला रिपोर्ट करण्याचे पायटला आदेश होते. १८०० तास विमान चालवण्याचा अनुभव असलेल्या वैमानिक मदनलाल कुकर यांनी त्यानुसार लगेचच कन्ट्रोलर टॉवरला रिपोर्ट केलं, नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. हे संभाषण होऊन काही सेकंदही उलटले नसतील तोच विमान पाण्यात कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. हा अपघात झाला ते ठिकाण किनाऱ्यापासून फार दुर नव्हतं. त्यामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगरातील काही रहिवाशांनी स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकु आल्याचं सांगितलं. तर काहींनी त्यांना समुद्रात उल्का पडताना दिसल्याचं सांगितलं. मात्र त्यांना नंतर लक्षात आलं की हा भयंकर असा अपघात होता.

अपघातानंतर अनेक दिवस वांद्रेतील रहिवाशांनी उपनगरातील किनाऱ्यांवर गर्दी केलीली असायची. समुद्रात सुरू असणारं शोधकार्य पाहण्यासाठी या लोकांनी इथे गर्दी केलेली असायची. नौदलाची जहाजं अपघातात वाचलेल्यांचा शोध घेण्याच्या आशेने समुद्रात दुरदुरपर्यंत शोध घेत होती. मात्र जेव्हा हे स्पष्ट झालं की तिथे कोणीही जिवंत वाचलं नाही, तेव्हा त्यांनी मलबा काढण्याच्या कामाला सुरूवात केली. फ्लाइट रेकॉर्डर मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला जेणेकरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट करू होऊ शकेल.

वरळीजवळ सापडले विमानाचे ७ टनाचे अवशेष

अपघाताच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ होताच तपास कार्याला सुरूवात झाली. विमानातील २१३ जणांपैकी कुणीतरी जिवंत असेल अशी आशा तपास पथकाला आणि देशातील सगळ्या नागरिकांना लागून होती. मात्र २९० प्रवासी आणि २३ कर्मचारी यांपैकी कुणालाच त्या काळरात्रीतूनं जिवंत परतू दिलं नाही. त्यानंतर विमानाचा मलबा वरळीजवळच्या समुद्रात आढळला. तेव्हा त्यामध्ये विमानातील सेफ्टी बोट, त्यामध्ये आपोआप हवा भरण्यासाठीचे सिलिंडर अशा सर्व गोष्टी सहीसलामत सापडल्या.

हेही वाचा: विमान प्रवासात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक : IATA

तपास कार्य सुरूच होतं. २ जानेवारीच्या रात्रीपासून तपास पथकाला अवशेष सापडण्यास सुरूवात झाली होती. कधी छिन्न विछिन्न झालेले, सडलेले मृतदेह सापडायचे, कधी कुणाचे पासपोर्ट सापडायचे तर कधी एखाद्याची बॅग. फार खोल समुद्रात हा अपघात झाला नव्हता, त्यामुळे नौदलाची मोठी जहाजं घटनास्थळी येऊ शकत नव्हती. त्यावेळी वरळीच्या कोळी बांधवांच्या मदतीनं हे तपासकार्य केलं गेलं. तपासकार्यात सापडलेले सर्व मृतदेह वेगवेगळ्या रुग्णालयांत पाठवले जात होते. या सर्व गोष्टींची माहिती तत्कालीन नौदल कमांडर जे.जी. नाडकरणी हे माध्यमांना द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनीही या गंभीर घटनेची दखल घेत मृतदेह ठेवलेल्या अशा काही शवागारांमध्ये जाऊन नातवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता.

अपघाताच इशारा मिळाला होता

अशोकाचा अपघात होण्याच्या काही दिवसांपूर्वीच प्राऊडीस्ट ऑर्गनायझेशनने भारताची विमानं पाडण्याचा इशारा दिला होता. लंडनच्या या ऑर्गनायझेशनने ही धमकी दिल्यानंतर सर्व विमानांची योग्य ती तपासणी करण्यात येत होती. विशेष म्हणजे अशोकाची सुद्धा तपासणी करण्यात आली होती असं एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र तरीही अपघात झाला ही आश्चर्याची गोष्ट होती. दुबईतील काही भारतीयांनी यानंतर आपल्या नातेवाईकांना १ जानेवारीला प्रवास करू नका असं सांगितलं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपलं तिकीटंही रद्द केलं होतं.

अपघात का झाला याचं उत्तर फक्त ब्लॅक बॉक्स देऊ शकत होता. हा ब्लॅक बॉक्स सापडता सापडता सहा दिवस उलटले. ६ तारखेला हा ब्लॅक बॉक्स सापडला होता. एका आंतरराष्ट्रीय पथकाने या बॉक्सचा शोध घेतला होता. मात्र पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स म्हणून जी वस्तू सापडली ती एक वेगळीच वस्तू होती. त्यानंतर समोर आलेल्या काही बातम्यांमधून असं समजतं की, विमानातील डायरेक्टर इंडीकेटर या यंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे वैमानिकाला योग्य स्थितीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.

हेही वाचा: आत्मनिर्भर भारत: आपणही बनवणार रडारला न सापडणारं फायटर विमान

१ जानेवारीला झालेल्या या अपघातातील मृतांचा आणि प्रवासी, कर्मचाऱ्यांचा जवळपास पुढचे १० दिवस शोध घेण्यात येत होता. कधी ३ तर कधी ३० अशी मृतदेह आणि विमानाचे अवशेष सापडत गेले. काही दिवसांनंतर तपासकार्य थांबलं. घटनेतील २१३ मृतांच्या नातेवाईकांसाठी, अपघाताच्या साक्षीदार असलेल्या किनारी भागातील लोकांसाठी, तपास कार्यात सहभागी असलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि जवळपास सर्व भारतीयांसाठीच वांद्रे विमान अपघाताची घटना कधीही विसरता येणार नाही अशी काळरात्र होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Air India
loading image
go to top