सलग फ्लाईटचा विक्रम एअर इंडियाच्या नावावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

आता दोन्ही वेळी फायदा
वाऱ्याच्या गतीचा आणि वेगाचा फायदा घेण्यासाठी एअर इंडिया आता जगप्रदक्षिणा करत या मार्गावर भ्रमण करणार आहे. येतानाही वाऱ्याचा वापर करता यावा, म्हणून हे विमान अटलांटिक मार्गे भारतात आणण्याची योजना आहे. सध्या हे विमान ताशी 9600 लिटर इतके इंधन वापरते या नव्या योजनेमुळे मोठी इंधनबचत होणार आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लांब अंतरावर सलग उड्डाणाचा विक्रम एअर इंडियाने स्वत:च्या नावावर केला आहे. दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को हे अंतर नेहमीच्या अटलांटिक समुद्राच्या मार्गाद्वारे कापण्याऐवजी ते प्रशांत महासागरावरून कापत हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला.

नेहमीच्या अटलांटिक मार्गापेक्षा हे नवे अंतर सुमारे 1400 किलोमीटर एवढे लांब होते; परंतु वाऱ्याच्या योग्य दिशेतील वहनामुळे बोईंग 777-200 एलआर या विमानाने हे अंतर नेहमीपेक्षा दोन तास अगोदरच पूर्ण केले. या प्रवासात विमानाने तब्बल 15,300 किलोमीटर एवढे अंतर केवळ 14.5 तासांत कापले. पहिल्यांदाच प्रशांत महासागरमार्गे गेलेल्या या विमानाचे सारथ्य कॅप्टन रजनीश शर्मा, गौतम वर्मा, एम. ए. खान आणि एस. एम. पालेकर यांनी केले.
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी ही पश्‍चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि वारेही याच दिशेत फिरतात. पश्‍चिमेकडे उड्डाण करताना समोरून वारे येत असल्याने विमानाची गती कमी होते; परंतु, याउलट पूर्वेकडे उड्डाण केल्यास वारे विमानाला पुढे ढकलू लागल्याने विमानाचा वेगही वाढतो. अटलांटिक मार्गावरून जाताना समोरून 24 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाचे वारे वाहत असल्याने विमानाचा वेग 800 कि.मी. प्रतितास असला, तरी तो मुळात 776 एवढाच राहत होता; परंतु, प्रशांत महासागरावरूनच्या नव्या मार्गावर अनुकूल अशी हवा 138 कि.मी. प्रतितास एवढ्या वेगाने वाहत असल्याने विमानाचा वेग 938 कि.मी. प्रतितास इतका पोचला होता.
सध्या दुबई ते ऑकलंड ही 14,210 किलोमीटर अंतराची इमिरेटसची सेवा जगातील सर्वांत लांबच्या विमान प्रवासात पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को ही अटलांटिक मार्गाद्वारे चालणारी एअर इंडियाची 13,900 किलोमीटर अंतराची सेवा दुसऱ्या क्रमांकावर होती; परंतु, आता पुढील दोन वर्षांसाठी हा मान एअर इंडियाकडे राहील. पुढील दोन वर्षांत सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ते न्यूयॉर्क ही 16,500 किलोमीटरची सेवा सुरू करणार असल्याने हा मान ओघानेच त्यांच्याकडे जाणार आहे.

Web Title: Air India makes record of continuous flights