एअर इंडियाच्या वैमानिकांना अखेर भत्ता 

पीटीआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : एअर इंडियाने वैमानिकांना जून महिन्याचा उड्डाण भत्ता अखेर दिला आहे. वैमानिकांनी गेल्या आठवड्यात भत्ता न मिळाल्यास काम थांबविण्याचा इशारा दिला होता. 

नवी दिल्ली (पीटीआय) : एअर इंडियाने वैमानिकांना जून महिन्याचा उड्डाण भत्ता अखेर दिला आहे. वैमानिकांनी गेल्या आठवड्यात भत्ता न मिळाल्यास काम थांबविण्याचा इशारा दिला होता. 

वैमानिकांना जून महिन्याचा उड्डाण भत्ता 20 ऑगस्टला देण्यात आला आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्याने दिली. उड्डाण भत्ता दोन महिन्यांनंतर देण्यात येतो. जूनचा उड्डाण भत्ता 1 ऑगस्टला मिळणे आवश्‍यक होते. "इंडियन कमर्शियल पायलट्‌स असोसिएशन'ने (आयपीसीए) 17 ऑगस्टला एअर इंडियाच्या वित्त संचालकांना पत्र लिहिले होते. यात उड्डाण भत्ता तातडीने न मिळाल्यास काम थांबविण्याचा इशारा देण्यात आला होता. असोसिएशनचे 700 वैमानिक सदस्य आहेत. दरम्यान, केरळमधील पुराच्या पार्श्‍वभूमीवर असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 19 ऑगस्टला पत्र पाठवून भत्ता न मिळाल्यासही काम करण्याची तयारी दर्शविली होती. 

सरकारी निधी थांबला 
सरकारी मालकीच्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने गेल्या वर्षी घेतला होता. तेव्हापासून सरकारने कंपनीला निधी देणे बंद केले आहे. हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने सरकारने सध्या कंपनीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला आहे. खासगीकरणाबाबत काही काळ थांबण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. 

सहा वेळा वेतन रखडले 
मागील सात महिन्यांत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे सहा वेळा वेतन रखडले आहे. कंपनीकडे निधीची कमतरता असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन 14 ऑगस्टला देण्यात आले होते. 

Web Title: Air India pilots allowance