ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारचं गिफ्ट; एअर इंडियाच्या विमानात हाफ तिकिट

टीम ई सकाळ
Wednesday, 16 December 2020

एअर इंडियाच्या संकेत स्थळावर या योजनेची पूर्ण माहिती आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियमही लागू केले जातील. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. देशातील 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आता एअर इंडियाचं तिकिट अर्ध्या दरात मिळणार आहे. याबाबत बुधवारी केंद्र सरकारने माहिती दिली. 

एअर इंडियाच्या संकेत स्थळावर या योजनेची पूर्ण माहिती आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियमही लागू केले जातील.  भारतीय नागरिकत्व असलेल्या, भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे. 

हे वाचा - समुद्रात भारताची ताकद वाढणार, नौदल 38 ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत

इकॉनॉमी केबिनमध्ये निवडण्यात आलेल्या श्रेणीच्या तिकिटाच्या किंमतीपैकी 50 टक्के रक्कम द्यावी लागेल. भारतातील कोणत्याही विभागात प्रवास करता येईल. तसंच तिकिट जारी केल्यानंतर एक वर्षापर्यंत  लागू असेल. प्रवासाच्या आधी सात दिवस तिकिट बूक केल्यास याचा लाभ घेता येईल. 

एअर इंडियाने याआधीही अशा प्रकारची योजना सुरू केली होता. आता याला केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. सध्या एअर इंडियाला खासगी कंपनीकडे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये पुन्हा एकदा टाटा कंपनी एअर इंडिया चालवण्यासाठी घेऊ शकते अशीही माहिती समोर आली होती. 

हेही वाचा- Vijay Diwas: भारताने पाकिस्तानला झुकवून जगाचा नकाशा बदलला होता

एअर इंडिया सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. 69 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज असलेल्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी कर्मचारीच पुढे आले आहेत. कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या एका ग्रुपने एअर इंडियाच्या खरेदीसाठी लिलावात भाग घेतला. एअर इंडियातील 209 कर्मचाऱ्यांच्या या ग्रुपने अमेरिकेतील एका प्रायव्हेट इक्विटी फर्म असलेल्या इंटरअप्ससोबत भागिदारी करून एअर इंडियात 50 टक्के भागिदारी खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: air india ticket in half price for senior citizen approve by indian government