Himachal Pradesh Vidhansabha Election 2022 : देवभूमीचा काँग्रेसला मदतीचा ‘हात’!

देवभूमी हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी पाच वर्षांत सरकार बदलण्याची परंपरा कायम राखताना भाजपचे स्वप्न धुळीस मिळवले आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले.
HImachal Pradesh
HImachal PradeshSakal
Summary

देवभूमी हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी पाच वर्षांत सरकार बदलण्याची परंपरा कायम राखताना भाजपचे स्वप्न धुळीस मिळवले आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले.

देवभूमी हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी पाच वर्षांत सरकार बदलण्याची परंपरा कायम राखताना भाजपचे स्वप्न धुळीस मिळवले आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. काँग्रेसचा हा विजय दणदणीत वगैरे म्हणता येणार नाही, परंतु २०१८ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर काँग्रेसच्या वाट्याला सतत पराभवच येत होते. त्यामुळे चार वर्षांनंतरचा हा विजय काँग्रेसला दिलासा देणारा आहे. तोही अशा परिस्थितीत की, ज्यात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा सहभाग शून्य राहिला आहे.

राहुल गांधी यांची प्रतिमा बदलविण्याचे एकमेव उद्दिष्ट घेऊन काढलेल्या भारत जोडो यात्रेवरच काँग्रेसचा भर आहे. गुजरातमधील एका सभेचा अपवाद वगळता राहुल यांनी हिमाचल प्रदेशच्या प्रचाराकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. प्रियांका गांधी यांच्या चार ते पाच सभा झाल्या. काँग्रेसची संपूर्ण भिस्त ही केवळ स्थानिक मुद्द्यांवर आणि स्थानिक नेत्यांवर राहिली. त्याचप्रमाणे विशेष प्रभारी म्हणून हिमाचलला पाठविलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसमध्येच फारसे गांभीर्याने न घेतले जाणारे प्रभारी राजीव शुक्ला यांच्यासारख्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील केंद्रीय नेत्यांवर होती. राज्यातले दिग्गज नेते वीरभद्रसिंह यांच्या निधनानंतर पक्षाकडे प्रभावी नेतृत्व नव्हते. नेमकी हीच गोष्ट काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचे म्हणता येईल. भाजपचे सर्वोच्च नेतृत्व (पंतप्रधान नरेंद्र मोदी) विरुद्ध काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व (राहुल गांधी) अशी व्यक्तीकेंद्रीत निवडणूक बनविण्याच्या भाजपचे प्रयत्न यामुळेच यशस्वी ठरले नाही.

पहाडी राज्य असलेल्या हिमाचलमध्ये प्रस्थापितविरोधी जनभावना, जवळपास पाच टक्के मते सहजपणे फिरवू शकणाऱ्या अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या प्रचाराचे वाढलेले आकर्षण, भाजप सरकारच्या धोरणामुळे सफरचंद उत्पादकांची प्रभावी लॉबी दुखावली जाणे अशा गोष्टींचा फटका भाजपला बसला. त्यामुळे सत्ता राखण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. यात भाजपला खऱ्या अर्थाने दणका बसला तो गटबाजी आणि बंडखोरीचा. मोदी-शहा यांची मजबूत पकड असल्याचे भाजपमध्ये सांगितले जाते. पण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशामध्येच ही पकड ढिली पडली. जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्री निष्क्रीयता, राज्यभरात प्रभाव राखून असलेले माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची उदासिनता आणि नड्डा यांच्याबद्दलचीही भाजपच्या स्थानिक संघटनेतील नाराजी ही त्याची ठळक कारणे म्हणता येतील.

या वादातच उमेदवार बदलण्याच्या म्हणजे भाकरी फिरवण्याच्या प्रकारांमुळे नाराजी वाढली. उपाध्यक्षांसह पाच ते सहा माजी आमदारांची पक्षातून हाकलपट्टी करावी लागली. या मंडळींनी बंडखोरी करून भाजपलाच आव्हान दिल्याने त्यांना चुचकारण्यासाठी अखेर खुद्द मोदी यांनाच पुढाकार घ्यावा लागला. फतेहपूरमधील भाजपचे बंडखोर उमेदवार कृपाल परमार यांच्याशी मोदींच्या मोबाईल संभाषणाची बातमी चांगलीच गाजली होती. अर्थात, परमार यांचे एकमेव उदाहरण नक्कीच नसावे. तरीही बंडखोरी झालीच. शेवटी शेवटी तर मोदींना प्रचारामध्ये आवाहन करावे लागले होते की उमेदवाराकडे नको तर कमळाच्या चिन्हाकडे बघून मतदान करा. पण त्याचा फारसा फरक पडला नाही. आता निकालामध्ये जिंकलेले जे तीन अपक्ष आहेत ते भाजपचे बंडखोर आहेत. त्यावरून भाजपमधील पराभवामागील अंतर्गत गटबाजीच्या कारणाचा अंदाज येऊ शकतो.

मोदी-शहा यांचे प्रचार दौरे होऊनही जयराम ठाकूर यांच्या मंत्रीमंडळातील ११ पैकी पाच मंत्र्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. आता गुजरातच्या दणदणीत यशाला दिल्ली महापालिकेपाठोपाठ हिमाचलमधील पराभवाचे गालबोट भाजपला पचवावे लागत आहे. हे पाहता गुजरातमधील विजय नरेंद्र मोदींचा आणि हिमाचलमधील पराभव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे असे म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय भाजपसमोर उरलेला दिसत नाही.

मी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाना राज्यपालांना सुपूर्द केला आहे. लोकांच्या विकासासाठी काम करणे थांबविणार नाही. आम्हाला काही गोष्टींचे विश्लेषण करण्याची गरज आहे. काही बाबी अशा होता, ज्यांनी निकालाची दिशा बदलली. पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलाविल्यास जाणार आहे.

- जयराम ठाकूर, मावळते मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयाचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावुक करणारा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांना ज्या प्रकारचे जनमत मिळाले होते. तशाच प्रकारे या निवडणुकीत काँग्रेसला मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसच्या आमदारांना सहजपणे एकमेकांना भेटण्यासाठी चंडीगड चांगले ठिकाण आहे. आम्हाला आमदारांना अवैधरीत्या पळवून नेण्याची भीती नाही.

- प्रतिभा सिंह, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, हिमाचल प्रदेश

फरक अल्प

भाजपचे केंद्रीय नेतृत्व विरुद्ध काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व अशी विषम लढत झाली. विजय मिळाला असला आणि जीव भांड्यात पडला असला तरी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिमाचलमध्ये काँग्रेससाठी सारे काही आलबेल नाही. हिमाचलला २०१२ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसने जिंकली तेव्हा पराभूत भाजपच्या तुलनेत मतांमध्ये जेमतेम चार टक्क्यांचा फरक होता. २०१७ मध्ये भाजप जिंकल्यानंतर ४८.८-४१.७ असा सात टक्क्यांपर्यंतच फरक होता. यावेळी भाजपच्या ४३ टक्क्यांच्या तुलनेत कॉंग्रेसला ४३.९ टक्के इतकीच मजल मारता आली आहे. हा फरक आणखी कमी झाला आहे. या आकडेवारीवरून काँग्रेसची वाटचाल सोपी नाही याचा अंदाज येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com