...तर अखिलेश विरोधात लढणार - मुलायमसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

माझा पक्ष आणि सायकलला वाचविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. अखिलेश माझे काही ऐकतच नाही. त्याचे वागणे असेच सुरु राहिल्यास मी त्याच्याविरोधात लढणार आहे. निवडणूक आयोगाकडून जो काही निर्णय घेण्यात येईल, तो मला मान्य असेल.

लखनौ - माझा मुलगा अखिलेश सध्या रामगोपाल यादव यांचेच ऐकून सर्वकाही करत आहे. त्याने माझे नाही ऐकले तर मी त्याच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या समाजवादी पक्षात यादव कुटुंबियांमध्ये कलह पहायला मिळत आहे. अखिलेश यादव व मुलायमसिंह यादव यांच्यात वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला असून, सायकल या चिन्हावर आज निवडणूक आयोगाकडून निर्णय येण्याची शक्यता आहे.

लखनौ येथे पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुलायमसिंह यादव म्हणाले, की मी माझा पक्ष आणि सायकलला वाचविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. अखिलेश माझे काही ऐकतच नाही. त्याचे वागणे असेच सुरु राहिल्यास मी त्याच्याविरोधात लढणार आहे. निवडणूक आयोगाकडून जो काही निर्णय घेण्यात येईल, तो मला मान्य असेल. आता अखिलेशने विचार करावा की वडीलांची साथ द्यायची की रामगोपाल यादव यांची. मी तीनवेळा अखिलेशला बोलविणे पाठविल्यानंतर तो एकदा आला. मी बोलण्यास सुरवात करण्यापूर्वीच तो निघून गेला. अखिलेशने जे काही केले आहे, ते मुस्लिमविरोधी आहे. आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करून, अल्पसंख्यांकांची काळजी घेऊ.

Web Title: Akhilesh Yadav is acting at the behest of Ramgopal. If he does not listen, I will fight against him: Mulayam Singh Yadav