भारतातील सर्व नागरिक माझीच माणसे : स्वराज

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली : केवळ मुस्लिम नागरिकांच्याच व्हिसाचा प्रश्‍न लवकर सोडवत असल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या ट्‌विटला स्वराज यांनी चोख उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : केवळ मुस्लिम नागरिकांच्याच व्हिसाचा प्रश्‍न लवकर सोडवत असल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या ट्‌विटला स्वराज यांनी चोख उत्तर दिले आहे.

हिंदू जनजागरण संघ या नावाने असलेल्या ट्‌विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांना ट्‌विट करत स्वराज यांच्यावर टीका करण्यात आली होती. "मोदीजी, सुषमाजी या केवळ मुस्लिमांच्या व्हिसाचीच काळजी करत आहेत. हिंदू नागरिकांना मात्र व्हिसा मिळविण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. यामुळे फार नाराज आहे,' असे ट्‌विटमध्ये म्हटले होते. मात्र, "भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय ही माझीच माणसे आहेत. त्यामुळे त्यांचा जात, राज्य, भाषा आणि धर्म कोणता, याच्याशी मला कर्तव्य नाही,' असे उत्तर देत सुषमा स्वराज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियाचा परिणामकारक वापर करत असल्याबद्दल स्वराज यांचे कायम कौतुक होत असते. काही दिवसांपूर्वीही त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत भारतीय भावनांचा अनादर करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीला वठणीवर आणले होते.

स्वराज यांनी कायमच त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या ट्‌विटची तातडीने दखल घेतली असल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या ट्‌विटरद्वारे सोडविल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. केवळ भारतीयांनाच नाही, तर काही विदेशी नागरिकांचीही त्यांनी मदत केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आखाती देशांमध्ये अडचणीत असलेल्या दहा हजार स्थलांतरित कामगारांचीही मदत केली होती. त्यांच्या या कामाची फॉरेन पॉलिसी या नियतकालिकाने दखल घेत 2016 मधील जागतिक विचारवंतांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.

Web Title: all indians are mine, says swaraj