विनाघटस्फोट दुसऱ्या लग्नामुळे आईचा मुलावरील ताबा संपुष्टात येत नाही; हायकोर्टाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या घरी या लहान मुलाचे आयुष्य धोक्यात आहे.

नवी दिल्ली : अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, घटस्फोट न घेताच केवळ नवीन संबंध प्रस्थापित केले आहेत, या कारणावरून एखाद्या महिलेला आपल्या अल्पवयीन अपत्याचा ताबा घेण्यापासून नाकारता येणार नाही. याबाबत बोलताना न्यायाधीश जे जे मुनीर यांनी म्हटलं की, घटस्फोट न घेताच एखादी महिला घर सोडून गेली असेल आणि तिने परपुरुषाशी लग्न करुन संबंध प्रस्थापित केले असतील तर तिला आपल्या अपत्याचा ताबा घेणे कायद्याने नाकारता येणार नाही. जर असं केलं तर त्या लहान अपत्याच्या एकूण वाढीवर आणि विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो. यातून त्या लहान मुलाचं भलं होणार नाही.

हेही वाचा - सीरमच्या परवडणाऱ्या लशीची पुनावालांनी दिली माहिती; जाणून घ्या काय असेल किंमत

राम कुमार गुप्ता यांनी यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये, राम कुमार गुप्ता यांनी म्हटलं होतं की त्यांची पत्नी संयोगिता हिने घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्यामुळे तिचा आपल्या मुलावरील हक्क संपुष्टात आला आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या घरी या लहान मुलाचे आयुष्य धोक्यात आहे. कारण तिची आई पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेताच दुसऱ्या व्यक्तीसोबत वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्यामुळे मुलाचा ताबा नैसर्गितरित्या त्याच्या वडिलांकडे असायला हवा. एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या घरी लहानग्याने राहणे धोक्याचे आहे.

कोर्टाच्या कामकाजादरम्यान संयोगिता यांनी म्हटलं की, गुप्ता हे एक निर्दयी वडील आहेत. त्यांनी तिच्यासोबत क्रूरपणे व्यवहार केला आहे. म्हणूनच तिने त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. यावर, कोर्टाने सांगितले की, हे लहान मुल सुरक्षित असेल की नाही हे निश्चित करणे आणि त्याच्या आईच्या नवीन घरात त्याचे कल्याण आहे की नाही सुनिश्चित करणे हे पाहणं कोर्टाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे, घटस्फोट न घेताच केवळ नवीन संबंध प्रस्थापित केले आहेत, या कारणावरून एखाद्या महिलेला आपल्या अल्पवयीन अपत्याचा ताबा घेण्यापासून नाकारता येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allahabad HC decision Mother Cant Be Denied Childs Custody on Entering New Relation Without Divorce