
गेल्या तीन जानेवारी रोजी DCGI ने भारतात दोन लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.
नवी दिल्ली : गेल्या तीन जानेवारी रोजी DCGI ने भारतात दोन लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित केली गेलेली कोविशिल्ड लस आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशींचा समावेश आहे. सीरमद्वारे तयार केल्या गेलेल्या ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या लशीची किंमतही आता समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितल्यानुसार, सरकारला कोविशिल्ड लशीचा एक खुराक 219 ते 292 रुपयांपर्यंत असेल. तर बाजारात त्याची किंमत दुप्पट असेल. म्हणजेच लशीसाठी 438 ते 584 रुपये द्यावे लागतील.
सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लशीचे पाच कोटी खुराक तयार केले आहेत. कंपनीचे CEO अदर पुनावाला यांनी सांगितलं की, कंपनी पहिल्या टप्प्यात भारत सरकार आणि GAVI शी निगडीत देशांना बाजारात लस विकण्यास सुरवात करेल. पुढे त्यांनी म्हटलं की, स्वस्त दरात लस उपलब्ध करुन देणं हे आमचं पहिलं उद्दीष्ट्य आहे. भारत सरकार ही लस मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याने ती स्वस्त दरात मिळेल.
हेही वाचा - ब्रिटनमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर; कोरोना संक्रमणाचा वाढला कहर
एका महिन्यात दहा कोटी खुराकांची निर्मिती
पुनावाला यांनी म्हटलं की, सीरम इन्स्टि्यूट आता लशीचे दहा कोटी खुराकाची निर्मिती एका महिन्यात करु शकते. शक्यता अशी आहे की, एप्रिलमध्ये ही उत्पादन क्षमता दुप्पट होईल. सरकारने आधीच सांगितलं आहे की, त्यांना जुलै 2021 पर्यंत तीन कोटी खुराकांची गरज असेल. हे खुराक आरोग्य कर्मचारी, वयस्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असतील. सीरम इन्स्टिट्यूट सरकारसोबत लशीचे उत्पादन तसेच वितरणाबाबतही सातत्याने संपर्कात आहे.
7 ते 10 दिवसांत होईल औपचारिकता पूर्ण
पूनावाला यांनी म्हटलं की, DCGI कडून मंजूरी मिळाल्यानंतर आता फक्त इतर औपचारिकता पूर्ण होणे बाकी आहे. यासाठी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. यानंतर सरकारी योजनेनुसार लशीचे वितरण होईल. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, चाचण्यांमध्ये कोविशील्ड लस 100 टक्के परिणामकारक आढळून आली आहे. चाचण्यांमध्ये लस दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची गरज भासलेली नाहीये. दोन ते तीन महिन्यांच्या आतच लशीचे दोन्ही खुराक देणे आवश्यक आहे.