अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू 

पीटीआय
सोमवार, 2 जुलै 2018

 खराब हवामानामुळे स्थगित केलेली अमरनाथ यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आज 6 हजार 877 भाविकांचा चौथा जत्था काश्‍मीरमधील वेगवेगळ्या शिबिरासाठी रवाना झाला. 

श्रीनगर - खराब हवामानामुळे स्थगित केलेली अमरनाथ यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आज 6 हजार 877 भाविकांचा चौथा जत्था काश्‍मीरमधील वेगवेगळ्या शिबिरासाठी रवाना झाला. 

काश्‍मीर खोऱ्यातील पूरस्थितीमुळे काल महामार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली होती. झेलम नदीची पाणीपातळी कमी झाल्याने भगवतनीनगर तळावरून भाविकांना अमरनाथ यात्रेला जाण्यास परवानगी दिली. भूस्खलन आणि पाऊस यामुळे काल 587 भाविक हेलिकॉप्टरने अमरनाथचे दर्शन घेऊ शकले. 

स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू 
अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था पाहणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. बानो भाई घडिया (वय 62) असे सेवादार (स्वयंसेवक) असे त्याचे नाव असून ते गुजरातच्या सुरतहून आले होते. पेहलगाम भागात नुऑन येथील छावणीत काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला. अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता दोन झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी बीएसएफच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा बेताब पर्वतरांगात कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: amarnath yatra started again