esakal | डोवाल यांच्या कॉलनंतर अमेरिका भारताच्या मदतीला तयार

बोलून बातमी शोधा

joe biden

कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करत भारताला मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

डोवाल यांच्या कॉलनंतर अमेरिका भारताच्या मदतीला तयार
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

वॉशिंग्टन - कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करत भारताला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पादनासाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल भारताला तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे सुलिवन यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारताला मदत करण्यात असमर्थता दर्शविल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. त्यामुळे वेगाने सूत्रे हालली आणि सुलिवन यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताला मदत करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. सुलिवन यांनी आज दोवाल यांच्याशी चर्चा करत भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

अमेरिकेच्या अडचणीच्या काळात जशी भारताने मदत केली, त्याचप्रमाणे आता भारताच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘अमेरिकेकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा भारताला पुरवठा करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असून लसनिर्मितीसाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिकेने वेगवान चाचण्यांसाठीचे टेस्ट किट, व्हेंटिलेटर, पीपीई किट भारताला दिले जातील. त्याशिवाय ऑक्सिजन आणि त्यासंबंधी इतर बाबीही पुरविण्याचा विचार आहे. अमेरिकेची तज्ज्ञांचे पथकही रोगनियंत्रणसाठी भारताशी समन्वय साधणार आहे,’ असे सुलिवन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: पुढील 15 दिवसांत देशात कोरोनाचा उद्रेक; दिवसाला 5 हजार रुग्णांचा मृत्यू?

अमेरिकेवर दबाव

अमेरिकेत असलेल्या अतिरिक्त लशी भारताला पुरविण्यास नकार देणाऱ्या बायडेन प्रशासनावर अमेरिकेतीलच अनेक घटकांकडून टीका झाली. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांकडूनही भारताला मदत करण्यासाठी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर दबाव वाढला होता. भारतात सध्या कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. भारताला अतिरिक्त ॲस्ट्राझेनेका लशींचा पुरवठा करावा, अशी विनंती अमेरिकेतील भारतीय वंशाचे संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी बायडेन प्रशासनाला केली होती. भारताला आत्यंतिक गरज असताना आपण लशी गोदामात ठेवून देऊ शकत नाही, असे कृष्णमूर्ती यांनी म्हटले होते. अमेरिकेत सध्या लशीचे चार कोटी डोस अतिरिक्त आहेत. भारताला पाकिस्तान आणि इराणकडूनही मदतीची तयारी दर्शविली जात आहे, पण अमेरिका मदत करायचे नाव काढत नाही, अशी नाराजी काही संस्थांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा: Iraq : कोविड रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; 82 जणांचा मृत्यू

परराष्ट्र मंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

भारतात संसर्गाचा विस्फोट झाला असून या परिस्थितीत त्यांच्या आरोग्य क्षेत्राला तातडीने मदत पुरवू, असे आश्‍वासन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दिले होते. ‘संकटाच्या परिस्थितीत आम्ही भारतीय जनतेच्या बाजूने आहोत. आम्ही भारत सरकारच्या संपर्कात असून त्यांना तातडीने मदत पुरवू’, असे ब्लिंकन यांनी ट्वीटरवरून म्हटले होते.