बादल यांनी स्वतःच्या कुटुंबाचा उत्कर्ष करवून घेतला

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

केजरीवालांवरही टीका
प्रचार दौऱ्यात शीख पगडी धारण करून स्वतः एक पंजाबी असल्याचा आव आणणारे अरविंद केजरीवाल हे खोटारडे आहेत. पंजाबमधील सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने बाहेरून आलेले केजरीवाल या निवडणुकीनंतर लगेच येथून पळ काढतील. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी टीका अमरिंदर यांनी केली.

चामकौर साहिब : पतियाळा ही आपली जन्मभूमी, तर लांबी ही कर्मभूमी असल्याचे प्रतिपादन पंजाब कॉंग्रेसप्रमुख अमरिंदर सिंग यांनी आज केले. धार्मिक अपवित्रीकरणासंदर्भातील सर्व तक्रारींची चौकशी करून त्यात जर का बादल दोषी आढळले, तर त्यांना शिक्षा करू, असे आश्वासनही त्यांनी पंजाबमधील जनतेला दिले आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत अमरिंदर सिंग बोलत होते. ते म्हणाले, ""आपली जन्मभूमी असलेल्या पतियाळाशी आपले भावनिक नाते असून, लांबीला आपण आपली कर्मभूमी मानले आहे. लांबीतील जनता प्रकाशसिंग बादल यांनी केलेले गुन्हे व चुका माफ न करता या निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल. बादल यांनी जातीवाद निर्माण करीत राज्यातील वातावरण प्रदूषित केले आहे. याबाबतची सर्व प्रकरणे आपण बाहेर काढून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांची रवानगी तुरुंगात करू.''

बादल हे गेल्या दहा वर्षांपासून स्वतःच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना तुम्ही कमावलेली संपत्ती ही मृत्युपश्‍चात स्वतःसोबत घेऊन जाणार आहात काय, असा प्रश्नही अमरिंदर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी शिरोमणी अकाली दल व भाजपवर टीका करताना ते म्हणाले, दोन्ही पक्षांना राज्यात जातीय सलोखा राखण्यात साफ अपयश आले आहे. कॉंग्रेसने सुरू केलेल्या स्मारकांची कामेही त्यांना पूर्ण करता आली नाहीत.

केजरीवालांवरही टीका
प्रचार दौऱ्यात शीख पगडी धारण करून स्वतः एक पंजाबी असल्याचा आव आणणारे अरविंद केजरीवाल हे खोटारडे आहेत. पंजाबमधील सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने बाहेरून आलेले केजरीवाल या निवडणुकीनंतर लगेच येथून पळ काढतील. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी टीका अमरिंदर यांनी केली.

Web Title: amerinder singh slams badal