अमेठीत पुन्हा झळकली राहुल हरविल्याची पोस्टर्स

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

गुजरातमध्ये राहुल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. राहुल यांनी नेहमी "एसपीजी'कडून संरक्षण घ्यावे, त्यांचे जीवन हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
सुदीप बंदोपाध्याय, तृणमूल काँग्रसचे नेते

इराणींनी कारस्थान रचल्याचा काँग्रसचा आरोप

अमेठी: काँग्रसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी हे हरविल्याची शेकडो पोस्टर्स येथे झळकल्याने काँग्रसची चांगलीच फजिती झाली आहे. राहुल यांना शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राहुल यांची प्रतिमा कलुषित करण्यासाठी जाणीवपूर्वक ही पोस्टर्स लावण्यात आल्याचा आरोप काँग्रसने केला आहे. स्थानिकांनी मात्र मागील पाच महिन्यांपासून राहुल मतदारसंघामध्ये फिरकलेच नसल्याचे म्हटले आहे.

राहुल हे मतदारसंघातूनच गायब असल्याने त्यांच्या खासदार निधीतून होणारी सगळी कामे खोळंबली आहेत, यामुळे त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांना आपली फसवणूक झाल्याचे वाटते. जो राहुल यांच्याबाबत माहिती देईल त्याला आम्ही योग्य बक्षीस देऊ, असे पोस्टर्सवरील मजकुरात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राहुल यांच्याविरोधात अशा प्रकारची पोस्टर्स झळकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा प्रकारची पोस्टर्स झळकली होती.

इराणींवर टीका
अमेठीत ही पोस्टर्स लावण्याचे कारस्थान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे असल्याचा आरोप काँग्रसचे स्थानिक आमदार दीपक सिंह यांनी केला आहे. राहुल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी इराणीच अशा प्रकारचे कारस्थान रचत आहेत. इराणी यांनी मतदारसंघासाठी काहीही केलेले नाही. केंद्र सरकारही आम्हाला सावत्र आईसारखी वागणूक देत आहे. राहुल यांनी मतदारसंघातील दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: amethi news rahul gandhi missing posters