esakal | अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Khare

अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. उच्च शिक्षण सचिव पदावरून ते ३० सप्टेंबरला निवृत्त झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खरे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यासंबंधीचा आदेश आज जारी करण्यात आला. त्यांची ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीवर केली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर असतील, असे आदेशात म्हटले आहे.

चारा घोटाळा प्रकरण काढलं होतं बाहेर

अमित खरे हे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) १९८५च्या तुकडीतील झारखंड कॅडरचे निवृत्त अधिकारी आहेत. सुमारे ३६ वर्षांच्या सेवेत त्यांनी केंद्र सरकारसह झारखंड आणि बिहार सरकारच्या प्रशासनात जबाबदारीची पदे भूषविली आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव शिक्षा भोगत असलेले चारा गैरव्यवहाराचे प्रकरण खरे यांनीच उघडकीस आणले होते. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी या प्रकरणी प्रथमच ‘एफआयआर’ची नोंद केली होती.

नव्या शैक्षणिक धोरणात सक्रिय भूमिका

अत्यंत कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ३४ वर्षांत नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात सक्रिय भूमिका होती. त्याचबरोबर डिजिटल मीडिया संबंधित नियमांत महत्त्वाचे बदल करण्‍यातही त्यांचा हातभार लागलेला आहे. माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा आणि माजी सचिव या पंतप्रधानांच्या सल्लागारांनी यंदा पदभार सोडल्याने खरे यांची नियुक्ती झाली आहे. अत्यंत पारदर्शपणे व ठामपणे निर्णय घेणे हे त्यांचे वैशिष्ट मानले जाते.

loading image
go to top