अमित शहा उद्या घेणार पालखीचे दर्शन

उमेश घोंगडे
शनिवार, 7 जुलै 2018

शहा हे उद्या दुपारी बारा वाजता पुण्यात येणार आहेत. आल्यानंतर लगेचच ते दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर प्रदेश भाजपाच्यावतीने आयोजित सोशल मीडियाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. 8) पुण्यात येणार असून, संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यानासाठी शहा उद्या पुण्यात येणार आहेत. या व्याख्यानाचीदेखील शहर भाजपाने जय्यत तयारी केली असून, व्याख्यानासाठी विविध क्षेत्रातील सुमारे दीड हजार जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

शहा हे उद्या दुपारी बारा वाजता पुण्यात येणार आहेत. आल्यानंतर लगेचच ते दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर प्रदेश भाजपाच्यावतीने आयोजित सोशल मीडियाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबाधिनीने आयोजित केलेले राभमाऊ म्हाळजी स्मृती व्याख्यान गणेश कला क्रीडा केंद्रात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दीड हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून, एकूण पाच हजार लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. 

सभागृहात दोन हजार सातशे लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पावसाचा व्यत्यय आला नाही तर सभागृहाचे बेसमेंट व पार्किंगच्या जागेत सुमारे आणखी तीन ते साडेतीन हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी बाहेर स्क्रीन लावण्यात येणार आहेत, असे शहराध्यक्ष गोगावले यांनी सांगितले. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्याख्यानाच्या कार्यक्रमाशिवाय अमित शहा बूथप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटीचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून विधानसभानिहाय तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. 

Web Title: Amit Shah will be present tomorrow for Palkhi