राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रप्रपंचावर अमित शहांचं भाष्य; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

भाजप या पत्राकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, असा प्रश्न अमित शहा यांना एका वृत्तवाहिनेने घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात अलिकडेच 'मंदिर प्रकरणा'वरुन झालेला पत्रप्रपंच वादग्रस्त आणि चर्चेस पात्र ठरला. या पत्रप्रपंचावरुन राज्यपालांवर चहुबाजुने टीकाही करण्यात आली. आता या वादग्रस्त प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पत्र वाचून तुम्हाला काय वाटले. भाजप या पत्राकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, असा प्रश्न अमित शहा यांना न्यूज 18 वृत्तवाहिनेने घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर आता अमित शहा यांनी उत्तर दिले आहे.

तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का? ज्या शब्दाचा तुम्ही द्वेष करत होतात? असा प्रश्न आपल्या पत्रातून राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवेल्लाय पत्रात विचारला होता. याबाबत अमित शहा यांनी म्हटलं की, मी पत्र वाचले आहे. त्यांनी या पत्रात जर काही शब्द टाळले असते तर अधिक बरं झालं असतं. त्यांनी पत्रातील विशेष शब्द टाळायला हवे होते. असं अमित शहा यांनी म्हटलं. 

हेही वाचा - यूपीतील पुजाऱ्यावरील हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण; पोलिसांच्या खुलाशाने खळबळ

काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी राज्यात मंदिरे सुरु करण्यावरुन भाजपने राज्यभरात आंदोलने केली होती. राज्यात दारुची दुकाने सुरु केलीयत तर मंदिरे उघडायला काय हरकत आहे? असा सवाल करत विरोधक आक्रमक झाले होते. यासंदर्भात राज्यपालांना भेटून विरोधकांनी मागणीची लिखित पत्रेही दिली  होती. यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्यासंदर्भात सवाल केला होता. राज्यपालांनी या पत्रात वापरलेली भाषा त्यांच्या पदाला साजेशी नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते.

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलं?
मंदिरे उघडण्यासंदर्भात भाजपने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपली मागणी लिखीत स्वरुपात दिली होती. अशी लिखीत स्वरुपातील तीन पत्रे आपल्या पत्रासोबत जोडून राज्यपालांनी ती उद्धव ठाकरे यांना पाठवली होती. या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उठवले होते. हेच का तुमचे हिंदुत्व? तुम्ही अचानक सेक्यूलर झालात की काय? असंही राज्यपालांनी आपल्या पत्रात उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं. 

हेही वाचा - रेल्वेचे ‘स्लिपर कोच’ पूर्णपणे बंद नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर
या पत्रावर उद्धव ठाकरे यांनीही सडेतोड शब्दांत उत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या घटनेची शपथ घेऊन आपण या पदावर आलात त्या घटनेतील सेक्यूलॅरिझम आपल्याला मान्य नाही का? मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसून स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या पत्राला उत्तर दिलं होतं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shaha statement over maharashtra governor & cm uddhav thackerey letter