यूपीतील पुजाऱ्यावरील हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण; पोलिसांच्या खुलाशाने खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्याने आपल्या शत्रूला फसवण्यासाठी प्रोफेशनल शूटरकडून स्वत:वर गोळ्या चालवल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्याने आपल्या शत्रूला फसवण्यासाठी प्रोफेशनल शूटरकडून स्वत:वर गोळ्या चालवल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या कटामध्ये मंदिराचे महंतदेखील सामील होते. महंताला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय हॉस्पिटलमधील पुजाऱ्याला बरे होताच अटक केली जाणार आहे. गोंडामध्ये 11 ऑक्टोंबर रोजी इटियाथोक भागात राम जानकी मंदिराचे पुजारी सम्राट दास यांच्यावर रात्री दोन वाजता गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. यात पुजारी जखमी झाल्याने त्याला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

गोंडा येथे पुजारीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरुन राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणावरुन विरोधकांनी योगी सरकारवर निशाणा साधला होता. पुजाऱ्यावरील हल्ल्यामागे सरकार आणि भूमाफिया यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर समाजवादी पक्षाच्या मते, उत्तर प्रदेशात सातत्याने पुजाऱ्यांवर निशाणा साधला जात असला तरी सरकारचे मौन कायम असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने तर मागील दोन वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये साधु-संतांवर 20 हल्ले झाल्याचे सांगत कागदपत्रेच दाखवली होती. काही हत्यांना आत्महत्या असल्याचे सांगत पोलिसांनी हे प्रकरण दाबूनही टाकल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पण, पोलिसांनी केलेल्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. 

अनिल देशमुख आणि खडसेंमध्ये गुप्तगू; सस्‍पेन्स कायम

पुजारी सम्राट दास आणि मंदिराचे महंत सीताराम दास यांनी हल्ल्यासाठी एका प्रोफेशनल शूटरला सुपारी दिली होती. त्यांनी शूटरला बजावलं होतं की, गोळी अशा पद्धतीने चालव जेणेकरुन जास्त इजा होणार नाही. शूटरने त्यांनी सांगितल्याप्रमाणे गोळी चालवली. जखमी पुजाऱ्याने हल्ल्यासाठी अमर सिंग याला जबाबदार ठरवले होते. राम जानकी मंदिराजवळील काही जमिनीवर अमर सिंग याला कबजा हवा असल्याचा आरोप पुजाऱ्याने केला होता. पुजाऱ्याच्या तक्रारीवरुन अमर सिंग याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमर सिंग पोलिसाच्या तावडीत अजून सापडलेला नाही. 

दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसने मागील काही दिवसात साधु-संतांवर झालेल्या हल्ल्याचा नकाशा जारी करत सरकारवर हल्लाबोल केला होता. यूपीत मागील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक साधुंच्या हत्या होत आहेत. काही हत्यांना पोलिसांनी आत्महत्येचे रुप दिले आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता. पण, नव्या खुलाशामुळे काँग्रेस तोंडावर आपटण्याची शक्यता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh yogi aadityanath gonda pujari up police said it was fake attempt