कॅ. अमरिंदर सिंग 16 मार्चला घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनीच दिली.

चंदीगढ (पंजाब) - काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनीच दिली.

आज (रविवार) अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या राज्यपालाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले, "आम्ही राज्यपालांना भेटलो. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे दावा केला. त्यासाठी 16 मार्च ही तारीख निश्‍चित करण्यात आली.'

काँग्रेसने पंजाबमध्ये एकूण 117 जागांपैकी तब्बल 77 जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता मिळविली आहे. तब्बल एक दशकानंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी लक्ष घालून देखील "आप'ला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या आणि शिरोमणी अकाली दलासोबत युती केलेल्या भारतीय जनता पक्षाला पंजाबमध्ये कोणताही प्रभाव दाखविता आला नाही. या युतीला केवळ 18 जागांवर यश मिळविता आले.

Web Title: Amrinder Singh to be sworn in as Pubjab CM on March 16