esakal | गरजुंसाठी मदतीचा हात! रिक्षामध्येच तयार केली रुग्णवाहिका

बोलून बातमी शोधा

गरजुंसाठी मदतीचा हात! रिक्षामध्येच तयार केली रुग्णवाहिका
गरजुंसाठी मदतीचा हात! रिक्षामध्येच तयार केली रुग्णवाहिका
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, बेड यांची कमतरता जाणवत आहे. यामध्येच आता रुग्णवाहिकादेखील अपूऱ्या पडत आहे. आतापर्यंत अनेक जणांचा रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे. म्हणूनच भोपाळमधील एका रिक्षाचालकाने एक भन्नाट कल्पना लढवत गरजुंच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.

सध्या सोशल मीडियावर भोपाळमधील एका रिक्षाचालकाची जोरदार चर्चा रंगली आहे. जावेद असं या रिक्षा चालकाचं नाव असून त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये रुग्णवाहिकेप्रमाणे सोयी सुविधांची व्यवस्था केली आहे.

"रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण जात असल्याच्या अनेक घटना सोशल मीडिया व बातम्यांच्या माध्यमातून कानावर येत होत्या. त्यामुळेच रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आणि समाजाप्रतीचं कर्तव्य म्हणून मी रिक्षामध्ये रुग्णावाहिका करण्याचा निर्णय घेतला", असं जावेद यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "रिक्षामध्ये रुग्णवाहिकेची सोय करावी यासाठी मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले. बराच वेळ ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी रांगेत उभा राहतो. तसंच गरजू रुग्णांना वेळात मदत मिळावी यासाठी मी माझा संपर्क क्रमांकदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. गेल्या १५-२० दिवसांपासून मी हे काम करत असून आतापर्यंत ९ गंभीर अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आहे."

हेही वाचा: फुफ्फुसच नव्हे शरीरातील 'या' भागांवरही होतो कोरोनाचा परिणाम

दरम्यान, जावेद यांनी त्यांच्या रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, मास्क अशा अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर जावेद व त्यांच्या रुग्णवाहिका रिक्षाची जोरदार चर्चा रंगली आहे.