छोट्या राज्यांमध्ये सत्ता बदलाचे मोठे खेळ

टीम ई-सकाळ
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मोठ्या राज्यांचे तुकडे करून छोटी राज्ये निर्माण झाल्यानंतर खरेच काय विकास झाला, हा नेहमी वादाचा विषय राहिला आहे. मात्र, या छोट्या राज्यांमध्ये अपवाद वगळता राजकीय अस्थैर्य कायम राहिले आहे. केंद्रशासित प्रदेशातून स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यानंतर गोव्यामध्ये सर्वाधिक राजकीय अस्थैर्य राहिले आहे. 

विधानसभा निवडणूक जाहीर होऊन रात्र उलटत नाही तोवर गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) राज्यातील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा आज (गुरूवार) काढून घेतला. या निर्णयाने गोव्यातील विद्यमान सरकारला काही फरक पडणार नसला, तरी लहान राज्यांमधील मोठ्या राजकीय आकांक्षांचा विषय त्यामुळे पुन्हा चर्चेत येत आहे. छत्तीसगड वगळता अन्य राज्यांमध्ये राजकीय आकांक्षांच्या पोटी सत्ताबदलाचे मोठे खेळ भारतीयांनी गेल्या तीन दशकांमध्ये पाहिले आहेत. 

गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात गोव्यासह चार नव्या राज्यांची निमिर्ती झाली. गोवा वगळता इतर तीन राज्ये मोठ्या आकाराच्या राज्यांमधून वेगळी होऊन अस्तित्वात आली. या छोट्या राज्यांचा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यापासूनचा राजकीय इतिहास पाहिला, तर छत्तीसगड वगळता अन्य राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीसाठी सतत सत्ताबदल होत राहिले आहेत. केवळ गोव्यामध्येच स्थापनेपासूनच्या तीस वर्षात तब्बल 18 मुख्यमंत्री होऊन गेले. याच काळात, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये 11 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ देववली गेली. छत्तीसगडमध्ये रमणसिंह सरकारने सर्वाधिक 13 वर्षे कार्यकाळाचा विक्रम केला आहे. मात्र, अन्य राज्यांमध्ये खूर्चीबदलाचा खेळ कायम राहिला आहे. 

गोवा

 • आधीचे राज्यः 1961 पर्यंत पोर्तुगीज; 1963 पर्यंत भारतीय लष्कर, 1963 पासून केंद्रशासित प्रदेश
 • स्थापनाः 29 मे 1987
 • पहिले मुख्यमंत्रीः प्रतापसिंह राणे (काँग्रेस)
 • कार्यकाळः 2 वर्षे 224 दिवस
 • विधानसभा सदस्यसंख्याः 40
 • स्थापनेपासून एकूण मुख्यमंत्रीः 18
 • एकूण सकल उत्पन्न (GDP):  49,000 कोटी रूपये

छत्तीसगड

 • आधीचे राज्यः मध्य प्रदेश
 • स्थापनाः 1 नोव्हेंबर 2000
 • पहिले मुख्यमंत्रीः अजित जोगी (काँग्रेस)
 • कार्यकाळः 3 वर्षे 27 दिवस
 • विधानसभा सदस्यसंख्याः 90
 • स्थापनेपासून एकूण मुख्यमंत्रीः 2
 • एकूण सकल उत्पन्न (GDP):  1, 85, 000 कोटी
 • मध्य प्रदेशचे सकल उत्पन्न (GDP):  5, 08, 000 कोटी रूपये

उत्तराखंड

 • आधीचे राज्यः उत्तर प्रदेश
 • स्थापनाः 8 नोव्हेंबर 2000
 • पहिले मुख्यमंत्रीः नित्यानंद स्वामी (भाजप)
 • कार्यकाळः 11 महिने 20 दिवस
 • विधानसभा सदस्यसंख्याः 71
 • स्थापनेपासून एकूण मुख्यमंत्रीः 10
 • एकूण सकल उत्पन्न (GDP):  1, 23, 000 कोटी रूपये
 • उत्तर प्रदेशचे सकल उत्पन्न (GDP): 9, 76, 000 कोटी रूपये

झारखंड

 • आधीचे राज्यः बिहार
 • स्थापनः 15 नोव्हेंबर 2000
 • पहिले मुख्यमंत्रीः बाबुलाल मरांडी (भाजप)
 • कार्यकाळः 2 वर्षे 122 दिवस
 • विधानसभा सदस्यसंख्याः 81
 • स्थापनेपासून एकूण मुख्यमंत्रीः 10 
 • एकूण सकल उत्पन्न (GDP):  1, 73, 000 कोटी रूपये
 • बिहारचे सकल उत्पन्न (GDP): 4, 02, 000 कोटी रूपये
Web Title: analysis of political instability in small states