...अन्‌ विरोधकांमध्येच संसदेत पडली फूट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

"चोर मचाये शोर', "तृणमूल'चे अनेक विद्यमान खासदार आणि वरिष्ठ नेते या गैरव्यवहारात गजाआड जायला हवे होते, असे टीकास्त्र या सदस्यांनी सोडल्याने सभागृहाच्या मध्यात येऊन "नरेंद्र मोदी चोर है' अशा घोषणा देत गोंधळ घालणाऱ्या तृणमूल सदस्यांचे अवसानच गळाले. 

नवी दिल्ली : अनियंत्रित-अनिर्बंध ठेव योजना प्रतिबंधक विधेयक (चिटफंड वगैरे) आज लोकसभेने संमत केले; परंतु ते विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा देणारे ठरले. कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकावर बोलताना पश्‍चिम बंगालमधील चिटफंड गैरव्यवहाराचा संदर्भ देऊन तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

"चोर मचाये शोर', "तृणमूल'चे अनेक विद्यमान खासदार आणि वरिष्ठ नेते या गैरव्यवहारात गजाआड जायला हवे होते, असे टीकास्त्र या सदस्यांनी सोडल्याने सभागृहाच्या मध्यात येऊन "नरेंद्र मोदी चोर है' अशा घोषणा देत गोंधळ घालणाऱ्या तृणमूल सदस्यांचे अवसानच गळाले. 

उपरोक्त विधेयकात सीबीआय आणि केंद्रीय तपास संस्थांना कोणत्याही राज्यात जाऊन तपासाचे विशेष अधिकार देण्याची तरतूद आहे आणि त्याला राज्यांचा विरोध आहे. तृणमूल कॉंग्रेसला तर ही तरतूद पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधातच असल्याचे वाटते. तरीही तृणमूलने सभापटलावर विधेयकाला पाठिंबा देण्याचीच भूमिका घेतली. 

काँग्रेसचा विरोध 

परंतु या वेळी गोंधळातच झालेल्या चर्चेत कॉंग्रेसचे सदस्य आणि कट्टर तृणमूल विरोधक अधीररंजन चौधरी यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतानाच पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी याचा तसा गैरवापर केला आणि लाखो गरीब लोकांचे घामाचे पैसे लुबाडले याचा पाढा वाचला. अधीररंजन हे "तृणमूल'वर हल्ला करीत असताना सोनिया गांधी सभागृहातच होत्या. 

महंमद सलीम यांची टीका 

अधीररंजन यांच्यानंतर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते महंमद सलीम यांनीही "तृणमूल'वर घणाघाती टीका करताना तृणमूलच्या सर्व प्रमुख नेत्यांचा या गैरव्यवहारात हात असून त्यांची रवानगी तत्काळ जेलमध्ये होण्याची आवश्‍यकता आहे असे म्हटले. अधीररंजन आणि महंमद सलीम यांच्या टीकास्त्रामुळे भाजपच्या सदस्यांना विलक्षण चेव चढला आणि ते तृणमूलच्या सदस्यांची चेष्टा व टिंगल करू लागले. अखेर विधेयक गोंधळातच संमत करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: and the opposition not together into parliament