आमदारानं घेतली मुख्यमंत्र्याच्या नावानं शपथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जून 2019

नेत्यांची मर्जी राखण्यासाठी कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. आंध्रातील एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने तर अतीच केले आहे. या महाशयांनी थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ घेण्याचा पराक्रम केला आहे. आंध्रातील या प्रकारामुळं राजकारणातील संस्कृतीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

हैद्राबाद: नेत्यांची मर्जी राखण्यासाठी कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. आंध्रातील एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने तर अतीच केले आहे. या महाशयांनी थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ घेण्याचा पराक्रम केला आहे. आंध्रातील या प्रकारामुळं राजकारणातील संस्कृतीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

श्रीधर रेड्डी असे या आमदारांचं नाव असून ते नेल्लोर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. रेड्डी यांनी स्वत:च्या या कृतीचं समर्थन केलं. मी माझ्या नेत्याला देव मानत असेल तर काय चुकलं,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'मी एका सामान्य कुटुंबातून आलोय. कुठलीही आशा-अपेक्षा नसताना जगनमोहन यांनी मला दोनदा आमदार बनवलं,' अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंध्र विधानसभेतील नव्या सदस्यांनी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वसाधारणपणे नवनिर्वाचित आमदार किंवा नवनियुक्त मंत्री ईश्वर, राज्यघटना किंवा विवेकबुद्धीला स्मरून शपथ घेतात. मात्र, श्रीधर रेड्डी यांनी शपथ घेताना मुख्यमंत्री जगनमोहन यांचं नाव घेतलं. त्यांचे हे बोल कानी पडताच सगळेच बुचकळ्यात पडले. विधानसभा अध्यक्ष संबांगी अप्पाला नायडू यांनी रेड्डी यांना लगेचच रोखले आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: andhra mla takes oath in the name of cm jaganmohan reddy