जगनमोहन रेड्डींनी घेतली PM मोदींची भेट, NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता

सकाळ ऑनलाईन
Tuesday, 6 October 2020

जुने घटकपक्ष साथ सोडून जात असतानाच काही पक्ष नव्याने एनडीएत येण्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रेड्डी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण त्यांनी 23 आणि 24 सप्टेंबर रोजीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. रेड्डी यांचा पक्ष एनडीएत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुने घटकपक्ष साथ सोडून जात असतानाच काही पक्ष नव्याने एनडीएत येण्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

वायएसआर काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या शक्यतेदरम्यान 8 महिन्यांनंतर रेड्डी आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होत आहे. बैठकीदरम्यान राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली किंवा नाही याबाबत काही समजू शकलेले नाही. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 40 मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीत रेड्डी यांनी थकीत रक्कम आणि कडप्पा येथील स्टील प्रकल्पासारख्या विविध योजनांच्या मंजुरीवर चर्चा केली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींकडे थकीत 10 हजार कोटींचे  महसूल अनुदान आणि पोलावरम योजनेसाठी 3250 कोटी रुपये वितरित करणे तसेच कुर्नुल जिल्ह्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्याची विनंती केली. 

हेही वाचा- बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार

पंतप्रधानांच्या भेटीनंतर रेड्डी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी कृष्णा गोदावरी नदी जलवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करतील. 

हेही वाचा- राहुल गांधींनी स्वत: ट्रॅक्टर चालवत केला हरियाणात प्रवेश

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नव्या कृषी कायद्याचा विरोध करत जुना घटकपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएची साथ सोडली होती. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सत्तानाट्यानंतर शिवसेनेही एनडीएचा त्याग केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy meet PM Narendra Modi