IAS ते राजकारण; स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या शाह फैझल यांचा आणखी एक धक्का

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 10 August 2020

भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन गेल्या वर्षी जम्मू काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) या राजकीय पक्षाची स्थापना करणारे शाह फैझल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

श्रीनगर- भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन गेल्या वर्षी जम्मू काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) या राजकीय पक्षाची स्थापना करणारे शाह फैझल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. फैझल यांनी कालच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सर्व राजकीय संदर्भ हटवत राजकारणापासून दूर जाण्याचे सूतोवाच केले होते. आजच्या राजीनाम्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

रक्ताळलेले कपडे आणि त्यात गुंडाळलेला चिमुकला जीव; बैरूत स्फोटानंतरचा फोटो...

पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत फैझल यांनी आपण राजकीय कार्य करण्याच्या स्थितीत नसल्याने जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. पक्षाचे उपाध्यक्ष फिरोज पीरजादा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. फैझल यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. जम्मू-काश्‍मीरच्या लोकांच्या हितासाठी काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने फैझल यांनी सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटकही झाली होती.

पक्षाने सोमवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय की, डॉ. शाह फैझल यांनी राज्य कार्यकारी मंडळाला कळवलं की ते राजकीय कार्य करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे ते पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छितात. त्यांच्या या विनंतीकडे लक्ष देत त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. जेकेपीएमने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, जोपर्यंत अध्यक्ष पदासाठी औपचारिक निवडणुका होत नाहीत. तोपर्यंत उपाध्यक्ष फिरोज पीरजादा अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमेटीने जावेद मुस्तफा मीर यांचाही राजीनामा स्वीकारला आहे. मीर माजी आमदार आहेत. 

तरुण पाण्यात बुडत असताना, महिलांनी जे केलं ते ऐकून तुम्हीही कराल त्यांना सलाम

जानेवारी 2019 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचा (आयएएस) राजीनामा देऊन शाह फैझल यांनी सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का दिला होता.  त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी जम्मू काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला देण्यात आल्याला विशेष दर्जा काढून घेत जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली होती. यासंदर्भात ऑगस्टमध्ये फैझल यांना अटक करण्यात आली होती. सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना अटक झाली होती. त्यांना जून महिन्यात सोडण्यात आले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another surprise from Shah Faizal who resigned from the IAS and formed the party