
जालना जिल्हामधील सेलगांव ता.बदनापूर येथील रिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय स्थरावरील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वयाच्या 22 व्या वर्षी देऊन देशातून 361 व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मराठवाड्यातून प्रथम येण्याची किमया शेख अन्सारने (Ansar Ahmad Shaikh)केली आहे. शेख अन्सार शेख अहमद यांचे शिक्षण जालना शहरापासून पासून 13 कि.मी. अंतरावर असलेल्या बदनापूर तालुक्यातील सेलगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्याने जालना येथील बद्रीनाथ महाविद्यालयात 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले.
माझ्या अब्बानी मला अभ्यास सोडण्यास सांगितले होते. अन्सार शेख यांनी एका मुलाखतीत सांगितल होत की, माझ्या अब्बा मी शाळा सोडावी म्हणुन माझ्या शाळेत पोहोचले होते, परंतु माझ्या शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितले की मी अभ्यासात खूप चांगला आहे. यानंतर मी दहावी आणि बारावी पास झालो मला 12 वी मध्ये 91% मिळाले होते त्यानंतर घरच्यांनी मला कधीच पुन्हा अभ्यासासाठी थांबले नाही. पुढे मी भारतीय प्रशासकीय सेवेत जायचेच असा निश्चय केल्यामुळे पुणे येथे चार वर्षे वस्तीगृहात राहून फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले.
कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या 22 व्या वर्षी आणि तेही पहिल्याच प्रयत्नात देशातून 361 वे स्थान मिळविले.पुण्यात फर्ग्यूसन कॉलेजात प्रथम वर्षाला असताना पुस्तक खरेदीसाठी माझ्याकडे 12 हजार रुपये नव्हते. उन्हाळ्याच्या सुटीत एनडीए कोचिंग क्लासमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी करू लागलो. आठ तास काम करून दरमहा आठ हजार रुपये पगार मिळत होता. दोन महिने काम करून सोळा हजार रुपये कमावले आणि पुस्तक खरेदी केली. क्लासमध्ये रिक्षाचालकाचा एक मुलगा शिकवण्यासाठी येत होता. बिकट परिस्थितीवर मात करून त्याने यश मिळवले होते. त्याचे वडील भविष्य पाहत असत. माझा भविष्यावर विश्वास नाही, पण त्यांनी आग्रह केल्यामुळे हात दाखवला. ‘तू क्लास वन ऑफिसर होऊ शकणार नाही, क्लास टू ऑफिसर होशील,’ असे त्यांनी सांगितले होते, पण मी खचलो नाही.
‘हाथो की लकीरों पे मत जाओ गालिब, नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नही होते’ या उक्तीवर माझा विश्वास होता. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास होऊन मी क्लास वन अधिकारी झालो. परीक्षेची तयारी अत्यंत संयमाने केली. वाचन करताना टिपणे काढावी लागतात. कलेक्टर होण्यासाठी निवडणूक लढवावी लागते, असा शाळेत असताना माझा समज होता, पण आमचे मापारीसर एमपीएससीची परीक्षा पास होऊन शिक्षणाधिकारी झाले होते. या सरांनी मला स्पर्धा परीक्षेची सविस्तर माहिती दिली.
बारवाले कॉलेजात बारावी झालो. विज्ञान आणि गणित विषय अजिबात आवडत नव्हते. सामान्य माणसाला या विषयांचा काहीही उपयोग नसतो, असे माझे मत आहे. त्यामुळे बारावीनंतर बीए केले. माझ्या गावापासून कॉलेजला जाण्यासाठी वडील दररोज दहा रुपये रिक्षासाठी देत असत, पण मी रिक्षाचालकाचा मुलगा असल्यामुळे इतर रिक्षाचालक माझ्याकडून पैसे घेत नव्हते. हेच पैसे माझे पॉकेटमनी असायचे. शाळेत खूप खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले. बारवाले कॉलेजात शिक्षकांनी यूपीएससी पॅटर्न समजावून सांगितला. मराठवाड्यात चांगले मार्गदर्शन नसल्यामुळे पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. बीएला फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. दोन ड्रेस व चप्पल असा वेष होता. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकलेला माझ्यासारखा विद्यार्थी संकोचला होता. इतर विद्यार्थी फाडफाड इंग्रजी बोलणारे व श्रीमंत घरातील होते. फर्ग्युसनमधील विद्यार्थ्यांना शिकवायची गरज नसते, असे म्हणतात इतके ते हुशार असतात. भरपूर अभ्यास करणे हाच माझ्यासमोर पर्याय होता. दररोज 14 ते 15 तास अभ्यास सुरू केला.
2015 मध्ये पदवी मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात यूपीएससीची पूर्व परीक्षा दिली. घरची परिस्थिती बेताची होती. चार वर्षांत ईदला फक्त दोनदा गेलो. भाऊ मामाकडे काम करुन पैसे पाठवत होता. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पूर्व परीक्षा पास झाल्याची भेट मिळाली. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फक्त शंभर दिवस होते. खूप लिखाण केल्यामुळे अंगठा सुजत होता, पण वीसपैकी वीस प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला होता. या काळात माझ्या भाऊजीचे निधन झाले. बहीण आणि दोन भाच्यांच्या चिंतेने व्यथित झालो, पण बहिणीने धीर दिला आणि परीक्षेची तयारी करण्यास सांगितले. 2 हजार 800 परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात मी होतो. पी. के. जोशी पॅनेल मुलाखत घेण्यासाठी होते. काही प्रश्न कायम आठवणीत आहेत.
जेव्हा मला मुस्लिम युवक कडवे झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या ओघाने चर्चा करताना शिया-सुन्नी अशी चर्चा झाली. तुम्ही कोण, असा प्रश्न केल्यानंतर मी ‘आय अॅम इंडियन मुस्लिम’ असे उत्तर दिले. उत्तर सर्वांना खूप आवडले.
संस्कृत विषयात मला शाळेत शंभरपैकी शंभर गुण होते. एवढे गुण कसे मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला. ‘सर, परीक्षेत जास्त टक्के मिळण्यासाठी संस्कृत विषय घेतात. रट्टा मारून एवढे मार्क्स मिळाले,’ असे मी प्रांजळपणे सांगितले. उत्तर ऐकून पॅनलमधील एक सदस्य म्हणाले, ‘मीसुद्धा रट्टा मारला होता.’ खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखत झाली.
मराठी माध्यमात परीक्षा देऊन मी उत्तीर्ण झालो. माझे शिक्षण मराठी, इंग्रजी माध्यमात झाले, तर मुलाखत हिंदी भाषेत झाली. 10 मे रोजी निकाल लागल्यानंतर आयुष्य खूप बदलल्याचे जाणवत आहे.
तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीशी परीक्षेचा काहीही संबंध नसतो. तुमच्या परिश्रमावर यश अवलंबून असते. ध्येय निश्चित करून प्रचंड मेहनत करा. अभ्यास करण्याची इच्छा असूनही अभ्यास होत नाही, असे अनेकजण सांगतात, पण तुम्हाला यूपीएससी का करायची आहे, या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला ताबडतोब प्रेरणा मिळते. आत्मविश्वास व प्रेरणा आतून आली पाहिजे. परीक्षाकेंद्री अभ्यास न करता ज्ञानकेंद्री अभ्यास करा. वयाच्या 22 व्या वर्षी देशात 61 वा क्रमांक मला मिळवता आला, तो केवळ ध्येयाच्या बळावर. स्वातंत्र्य, समता व बंधूता ही मूल्ये जगायला शिका. तुमच्यातील चांगला माणूसच तुमचे यश अधोरेखित करेल.