Guinness Record: सहा वर्षांचा अरहम ठरला जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेट एक्झाममध्ये सर्टिफिकेट मिळवायला 1000 पैकी 700 गुण आवश्यक होते मात्र, त्याने या परिक्षेत 900 गुण मिळवले आहेत. 

अहमदाबाद : पाच-सहा वर्षांचं वय हे खेळण्या-बागडण्याचं वय असतं. या वयात मुले टिव्ही पाहण्यात, गेम्स खेळण्यात आपला वेळ घालवतात. मात्र या वयात एखाद्या लहानग्याने गेम्स तयार केल्याची घटना तुम्हाला कळली तर धक्का बसेल ना? पण हे खरंय! सर्वांत लहान कम्प्यूटर प्रोग्रॅमर म्हणून अहमदाबादच्या एका मुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. पायथॉन प्रोग्रॅमिम लँग्वेज क्लिअर करणारा हा चिमुरडा अवघ्या सहा वर्षांचा आहे. या चिमुरड्याचं नाव अरहम ओम तलसानिया असं आहे. तो सध्या इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. त्याने मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेट एक्झाम परिक्षा पास केली आहे. 

या परिक्षेत सर्टिफिकेट मिळवायला 1000 पैकी 700 गुण आवश्यक होते मात्र, त्याने या परिक्षेत 900 गुण मिळवले आहेत. त्याने म्हटलंय की, माझ्या वडीलांनी मला कोडींग शिकवलं आहे. मी दोन वर्षांचा असल्यापासूनच टॅब वापरतो. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून IOS आणि Windows असलेले गॅझेट्स वापरतो आहे. नंतर मला समजलं की माझे वडील पायथॉन लँग्वेजवर काम करत आहेत.  अरहमने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. 

हेही वाचा - बिहारचा निकाल काल; आज राहुल गांधी सुट्टीसाठी दोन दिवस जैसलमेर दौऱ्यावर

मला जेंव्हा पायथॉनकडून सर्टिफिकेट मिळालं तेंव्हा मी लहान गेम्स तयार करत होतो. त्यानंतर त्यांनी मला मी काम केल्याचे काही पुरावे मागितले. काही महिन्यांनंतर त्यांनी मंजूरी दिली आणि मग मला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट प्राप्त झाले असं त्याने म्हटलं. एक बिझनेस एंटरप्रिन्योर बनण्याचे त्याचे स्वप्न आहे जेणेकरुन त्याला सर्वांना मदत करता येईल. त्याने म्हटलंय की, मला व्यावसायिक उद्योजक बनायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे. मला ऍप्स, गेम्स आणि कोडींग करायचे आहे. मला गरजू लोकांना मदत देखील करायची आहे. असं त्याने म्हटलंय. 

हेही वाचा - Bihar Election : 'देशाला दिशाभूल करणाऱ्या लोकांना मिळालेला हा धडा'

अरहम तसलानियाचे वडील ओम तसलानिया हे स्वत: सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या मुलाला कोंडीगमध्ये आवड निर्माण झाली आणि म्हणून मी त्याला प्रोग्रॅमिंगच्या मुलभूत गोष्टी शिकवल्या. तो खुप लहान असल्याने त्याला गॅझेट्समध्ये पहिल्यापासूनच आवड होती. त्याला टॅबवर गेम खेळायला आवडायचे. तसेच त्याला पझल सोडवायलाही आवडायचं. जेंव्हा त्याला व्हिडीओ गेम्स खेळण्यात आवड निर्माण झाली तेंव्हा त्याने त्या बनवण्याचाही विचार केला. त्याने मला कोडींग करताना नेहमी पाहिलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मी त्याला प्रोग्रॅमिंगचे बेसिक्स शिकवले आणि त्याने लहान लहान गेम्स बनवायला सुरवात केली. त्याला मायक्रोसॉफ्टकडून इतक्या लहान वयात याबाबत सर्टिफिकेट मिळाले आणि म्हणून आम्ही गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arham Class 2 student created Guinness World Record as Worlds Youngest Computer Programmer