Bihar Election : 'देशाला दिशाभूल करणाऱ्या लोकांना मिळालेला हा धडा'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

अमित शहा यांनी म्हटलंय की, बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासनाला परत निवडण्यासाठी राज्यातील सर्व बंधु-भगिणींचे मी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगलेला पहायला मिळाला. पण अंतिमत: नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल, असं दिसत आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटून त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तेजस्वी यादवांनी 'तेजस्वी' अशी कामगिरी करत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून राजदला 75 जागांवर निवडून आणलं आहे. मात्र, आपली सत्ता राखायला यशस्वी ठरलेल्या एनडीएचं कौतुक करत अमित शहा यांनी आता ट्विट केलं आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'बिहार में फिरसे नितीश कुमार बा'; समर्थकांनी लावले पोस्टर्स

त्यांनी म्हटलंय की, या निवडणुकीमध्ये ज्या उत्साहाने जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि एनडीएच्या धोरणांना आपले समर्थन दाखवले ते खरोखर अद्भुत आहे. हा परिणाम फक्त कोरोनाच्या विरोधात मोदी सरकारच्या यशस्वी लढाईला दाखवत नाही तर गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि युवकांचा विश्वास दिसून येतो. तसेच हा देशाला दिशाभूल करणाऱ्या लोकांना मिळालेला एक धडा देखील आहे. 

पुढे त्यांनी म्हटलंय की, बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासनाला परत निवडण्यासाठी राज्यातील सर्व बंधु-भगिणींचे मी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. मी खासकरुन बिहारच्या युवकांचे आणि महिलांचे आभार मानतो ज्यांनी बिहारमध्ये सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्याला निवडून एनडीएचे पूर्ण बहुमताचे सरकार बनवले.

बिहारच्या प्रत्येक वर्गाने पुन्हा एकदा पोकळ आश्वासने, जातीयवाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला संपुर्णत: नाकारले आहे आणि एनडीएच्या विकासवादाचा झेंडा फडकवला आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या डबल इंजिन विकासाचा हा विजय आहे. बिहारच्या कार्यकर्त्यांचंही अभिनंदन... असंही त्यांनी म्हटलं आहे. 

एनडीएने आता या विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला सुरु केलं आहे. पाटणामध्ये आनंद साजरा करण्यासाठी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर 'बिहार में का बा?' असा  प्रश्न टाकून त्याखाली 'फिर से नितीश कुमार बा!' असं लिहलं आहे. याप्रकारचे अनेक पोस्टर्स लावले आहेत. एका पोस्टरवर नितीश कुमार यांच्या फोटो लावून बिहार ने फिर से चुना 24 कॅरेट गोल्ड असं लिहलं आहे.

हेही वाचा - Bihar Election 2020: राजकारणात 'तेजस्वी' स्थान अधोरेखित

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात झाली. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मतमोजणीच्या आधी सर्व अंदाजांनी तेजस्वी यांना स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, अंतिम क्षणापर्यंत चुरस होऊन सरतेशेवटी एनडीएची डबल इंजिन सरकारला बहुमत  प्राप्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election 2020 home minister amit shaha on bihar election results 2020