बिहारचा निकाल काल; आज राहुल गांधी सुट्टीसाठी दोन दिवस जैसलमेर दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडमधून खासदार असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बुधवारी जैसलमेरमध्ये येणार आहेत.

जयपुर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडमधून खासदार असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बुधवारी जैसलमेरमध्ये येणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, राहुल गांधी येथे दोन दिवसांपर्यंत थांबतील. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. बिहारमध्ये काँग्रेसने 70 जागांवर निवडणुका लढवल्या होत्या मात्र, त्यापैकी फक्त 19 जागांवरच काँग्रेसला आपला विजय मिळवता आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी खासगी विमानाने बुधवारी जैसलमेरमध्ये येत आहेत. त्यांचा हा दौरा गोपनीय ठेवण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'देशाला दिशाभूल करणाऱ्या लोकांना मिळालेला हा धडा'

राहुल गांधी करताहेत जैसलमेरचा दौरा
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे जैसलमेर जिल्ह्यामधील फाईव्ह स्टार हॉटेल सूर्यगढमध्ये थांबणार आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात सचिन पायलट यांच्यासोबत वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोट यांनी आपल्या आमदारांनाही याच हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं. 'इंडिया टुडे' च्या रिपोर्टनुसार राहुल गांधींच्या या दौऱ्यामध्ये रात्री तंबुत मुक्काम करण्याचाही समावेश आहे. त्यांच्या या दौऱ्यासाठी स्थानिक नेत्यांनी चांगलीच तयारी केली आहे. सोबतच काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधींच्या या दौऱ्याबाबत जास्त उत्साह दाखवण्याबाबत मनाई केली आहे. तसेच राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत त्याच्या आसपास कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली आहे. 

कडक सुरक्षा व्यवस्था 
राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी अधिकारी मंगळवारीच जैसलमेर पोहोचले आहेत. आपल्या दोन दिवसांच्या या दौऱ्यात राहुल ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेबाबत लक्ष देण्याचे काम स्थानिक पोलिस आणि प्रशासन करत आहे. असं सांगितलं जात आहे की, जैसलमेरमध्ये दोन दिवस घालवल्यानंतर राहुल गांधी हे शुक्रवारी दिल्लीला परतणार आहेत. 

हेही वाचा - Bihar Election 2020: राजकारणात 'तेजस्वी' स्थान अधोरेखित

बिहार निवडणुकीत खराब कामगिरी
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राजदसोबत महागठबंधन करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत राजदच्या तेजस्वी यादव यांनी तुफान कामगिरी करत निवडणुकीत खऱ्या अर्थाने जाण आणली. मात्र, त्या तुलनेत काँग्रेसला फार काही जलवा दाखवता आला नाहीये. उलट 2015 च्या निवडणुकीत त्यांना 27 जागा मिळालेल्या होत्या त्यादेखील घटून यंदा 19 जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi on jaisalmer tour for two days after bihar election results 2020