दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ - लष्करप्रमुख

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र वापराच्या धमकीला जनरल रावत यांनी फारसे महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, ""जेव्हा सीमांचे रक्षण करण्याचा प्रश्‍न उपस्थित होईल, त्या वेळी अशा विधानांचा काही उपयोग होणार नाही. अण्वस्त्रे ही संतुलन राखणारी शस्त्रे आहेत.

नवी दिल्ली - ""दहशतवाद्यांच्या कारवायांना भारत अशाप्रकारे चोख प्रत्युत्तर देईल, की पाकिस्तानला घुसखोरी व दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा लागेल,'' असा इशारा नवे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज दिला.

पाकिस्तानात नुकत्याच केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये तेव्हा लष्कराचे उपप्रमुख असलेल्या जनरल रावत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 31 डिसेंबर रोजी त्यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आज वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ते म्हणाले, ""दहशतवाद्यांना आम्ही अशाप्रकारे ठोस प्रत्युत्तर देण्यात येईल, की त्यामुळे पाकिस्तानला भविष्यात दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याचा फेरविचार करावा लागेल.''

शत्रूलासुद्धा वेदना देण्याची गरज आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले होते. याबाबत ते म्हणाले, ""दर वेळी दहशतवाद्यांनी दिलेल्या वेदनांना एकाच प्रकारे प्रत्युत्तर दिले जात नाही. खोऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी सक्रिय आहेत. ते सामान्य नागरिक व जवानांविरुद्ध हिंसाचाराच्या कारवाया करत आहेत.''

पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र वापराच्या धमकीला जनरल रावत यांनी फारसे महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, ""जेव्हा सीमांचे रक्षण करण्याचा प्रश्‍न उपस्थित होईल, त्या वेळी अशा विधानांचा काही उपयोग होणार नाही. अण्वस्त्रे ही संतुलन राखणारी शस्त्रे आहेत. अण्वस्त्रांचा प्रथम वापर करायचा की नाही या भूमिकेबाबत सध्या फेरविचार सुरू आहे; मात्र हा निर्णय माझ्या नव्हे, तर सरकारच्या पातळीवर घेतला जातो.''

लष्कराच्या आधुनिकीकरणाबद्दल ते म्हणाले, ""नवे तंत्रज्ञान, तसेच शस्त्रास्त्र प्रणाली अंगीकारण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्ट देशात बनविता येणार नाही. आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी शस्त्र उत्पादनासाठी सहकार्य करण्याचा, तसेच नंतर ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे, जेणेकरून देशांतर्गत उद्योगाला लाभ होईल.''

Web Title: Army Chief warns against terrorism