सायबर सुरक्षेसाठी भारतीय लष्कराचे नवे 'BOSS'

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

फौजेच्या सुरक्षासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या माहितीला अधिक संरक्षण देण्यासाठी हा उपयुक्त पर्याय आहे.

नवी दिल्ली : आपले संपर्क आणि माहितीचे नेटवर्क यांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय लष्कर एक स्वदेशी सॉफ्टवेअर विकसित करीत आहे. विदेशी हेरांपासून संरक्षण करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे. 

भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन्स (BOSS) असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे. सायबर सुरक्षा वाढविण्यावर भर द्यावा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. तिन्ही सेनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सायबर क्षेत्रातील धोक्यांविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले होते.  त्याला अनुसरून हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. 

लष्कराच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित उत्तर विभागाने (नॉर्दर्न कमांड) स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टमचे लष्कराच्या गरजेनुसार मूल्यांकन सुरू केले. 
"नॉर्दर्न कमांड आपल्या मुख्यालयात BOSS चे मूल्यांकन करीत आहे. विदेशी सॉफ्टवेअरला पर्याय म्हणून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. येथे तैनात फौजेच्या सुरक्षासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या माहितीला अधिक संरक्षण देण्यासाठी हा उपयुक्त पर्याय आहे," संरक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: Army gets new software to enhance cyber security