esakal | राज्यांच्या मदतीसाठी लष्कर सरसावणार

बोलून बातमी शोधा

rajnath singh
राज्यांच्या मदतीसाठी लष्कर सरसावणार
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना संकटाचा मुकाबल्यासाठी राज्य सरकाराना लष्करी मदतीची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली असून निवृत्त लष्करी अधिकारी, जवानांची, निवृत्त लष्करी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कशा प्रकारे मदत घेता येईल, याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावे अशा सूचनाही राजनाथसिंह यांनी आज राज्यपालांना दिल्या आहेत.

दरम्यान, ऑक्सिजन टॅंकरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० आणि २० मॅट्रिक टन साठवण क्षमतेचे २० क्रायोजेनिक टॅंकर आयात केले असून राज्यांना दिले आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सर्व राज्यांच्या राज्यपालांशी चर्चा केली आणि कोरोना संकटाच्या स्थितीचा आढावा घेतला. याआधी लष्कराकडून केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. आज संरक्षण मंत्र्यांनीही या मदत कार्याचा आढावा घेतला. यामध्ये रुग्णालयांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा महत्त्वाचा होता.

हेही वाचा: देशावर संकट येताच बड्या उद्योगपतींनी धरली परदेशाची वाट

त्यापार्श्वभूमीवर हवाईदल तसेच नौदलामार्फत ऑक्सिजन पुरवठ्याच्या कामगिरीची माहिती घेण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे लष्कराचे निवृत्त अधिकारी, जवानांसाठी असलेल्या आरोग्य सेवेसाठीच्या देशभरातील ५१ केंद्रांवर अतिरिक्त मनुष्यबळाची गरज पाहता कंत्राटी कर्मचारी भरतीला संरक्षण मंत्र्यांनी मान्यता दिली. हवाई दलाप्रमाणेच नौदलाने आयएनएस शारदा या युद्धनौकेच्या मदतीने ऑक्सिजन सिलिंडर अगाट्टी, अॅन्ड्रोट, काडमाट आणि कवरत्ती या बेटांवर पोहोचविण्यात आले आहेत. तसेच दुसरी खेपही आज रवाना झाली आहे.

यासोबतच आयएन एलसीयू ५५ या जहाजाद्वारे विशाखापट्टनमच्या डॉकयार्डमधून ऑक्सिजन सिलिंडर आणि वैद्यकीय उपकरणे पोर्टब्लेअर (अंदमान निकोबार बेटे) येथे पोहोचविण्यात आली आहेत.

दुबईहून सहा कंटेनर दाखल

हवाई दलाच्या सी-१७ विमानाद्वारे दुबईहून सहा रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर काल पश्चिम बंगालमधील पानगडमध्ये एका दिवसात पोहोचविण्यात आले. तर आज चार रिक्त कंटेनर बॅंकॉक (थायलंड) येथून हवाई दलाने आणले. याशिवाय एक क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर बडोद्याहून रांचीला हवाई दलाने पोहचविला असून दोन कंटेनर पुण्याहून जामनगरला, दोन कंटेनर भोपाळहून जामनगरला तर जयपूरहून जामनगरला पोहोचविले आहेत. शिवाय इंदोरहून तीन कंटेनर जामनगरला पोहोचविण्यात आले आहेत. तर एक क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर हवाई दलाच्या हिंडन तळावरून पश्चिम बंगालमधील पानगडला पोहोचविला आहे.