esakal | देशावर संकट येताच बड्या उद्योगपतींनी धरली परदेशाची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

plane

देशावर संकट येताच बड्या उद्योगपतींनी धरली परदेशाची वाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- ऑक्सिजन बेडची कमतरता, औषधांचा अपुरा साठ्यामुळे देशांतील हजारो नागरिक हैराण झालेले असताना बडे उद्योगपती आणि अन्य उच्चभ्रु मंडळी मात्र लाखो रुपये खर्चून भारताबाहेर जात आहेत. कोरोना प्रसारामुळे देशाबाहेर जाणारी मंडळी युरोप, मध्यपूर्व आशिया आणि हिंद महासागरातील देशांत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सेलिब्रिटी आणि उद्योगपती दहा पट अधिक पैसे मोजून दुबईला जात आहेत.

नवी दिल्लीतील खासगी जेट कंपनी क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा म्हणाले, केवळ गर्भश्रीमंतच नाही तर ज्यांना खर्च परवडत आहे, अशीही मंडळी खासगी जेटने देशाबाहेर गेले आणि जात आहेत. भारतात सोमवारी चोवीस तासात सुमारे ३५२,९९१ नवीन रुग्णांची भर पडली. हा आकडा जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कोरोनाच्या फैलावामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण येत असताना बॉलिवूडचे सुपरस्टार मात्र परदेशात रवाना होत आहेत. अनेक सेलिब्रिटी मालदीव येथे असल्याचे उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या किमान तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेत घरची वाट धरली आहे.

हेही वाचा: मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना ओसरणार; IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा दावा

भारतातील सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोक परदेशात जात असल्याचे पाहून अनेक देशांनी विविध निर्बंध आणले आहेत. ब्रिटन, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, हॉंगकॉंग सारख्या देशांनी अनेक बंधने घातली आहेत. काही देशांकडून कडक नियम आणण्याची तयारी केली जात आहे. मालदिव सरकारने भारतीय नागरिकांना देशात सर्वत्र फिरण्यास मनाई केली आहे. मात्र यातून काही रिसॉर्ट वगळल्याने तेथे गर्दी दिसून येत आहे. राजन मेहरा यांच्या मते, लंडन आणि दुबई येथे बंदी घालण्यापूर्वी बरीच भारतीय मंडळी तेथे पोचली. मेहरा यांनी कतार एअरवेजचे प्रमुख काम पाहिले आहे. त्यांच्या मते, नवी दिल्लीहून दुबईला जाण्याचे एकेरी तिकीट सुमारे १५ लाख रुपयांचे आहे. खासगी जेट कंपन्या रिटर्न जर्नीचे देखील शुल्क आकारत आहेत. खासगी जेट विमानाचे भाडे अगोदरच जादा असते, परंतु सध्याच्या काळात तिकिटाचे दर प्रचंड वाढले आहेत.

हेही वाचा: विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना

लोकेशनची संख्या कमी

इजी ट्रिम प्लॅनर्स इंडियाचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांच्या मते, आता तत्काळ प्रवासासाठी लोकेशन खूपच कमी राहिले आहे. कारण लंडनसारख्या शहरांनी निर्बंध आणल्याने प्रवासावर मर्यादा आणल्या आहेत. दुबईचे तिकीट सामान्यापेक्षा दहा पटीने अधिक आकारले जात आहे. यावरुन भारतातील सेलिब्रिटी भारताबाहेर जाण्यास किती उत्सुक आहेत, हे समजते, असे पिट्टी म्हणाले.

loading image