अटक
अटक sakal

प्राध्यापक अटक वादात

प्रा. रतनलाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना आक्रमकपणे पुढे आल्या आहेत

नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाला केलेल्या अटकेवरून राजकारण तापले आहे. प्रा. रतनलाल यांनी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. त्यावरून त्यांच्याविरूध्द विनीत जिंदाल या वकिलाने तक्रार केली होती. हिंदू महाविद्यालयात अध्यापन करणारे प्रा. रतनलाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना आक्रमकपणे पुढे आल्या आहेत. उत्तर दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षकही जोरदार निदर्शने करत आहेत. रतनलाल यांना न्यायालयाकडून जामीन न मिळाल्यास निदर्शनांची धग सोमवारी शिक्षण मंत्रालयासमोर (शास्त्री भवन) पोहोचू शकते.

दिल्ली पोलिस रतनलाल यांना आज न्यायालयासमोर हजर करणार आहेत. रतनलाल यांनी वाराणसीतील शिवलिंगाबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यांना दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेने मॉरीस नगर येथील निवासस्थानातून अटक केली. त्यांच्याविरूध्द भारतीय दंडविधानातील कलम १५३-अ (धर्म, जात, जन्मस्थान, निवास, भाषा आदींच्या आधारावर विभिन्न समूहांत वैमनस्य पसरवणे ) व २९५ अ या कलमांनुसार समाजात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतनलाल यांच्या टिप्पणीमुळे एका संवेदनशील विषयावर समाजात धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो असे जिंदाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वाराणसीतील मशिदीत सापडलेले शिवलिंग हा अत्यंत नाजूक मुद्दा असून तो न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. रतनलाल यांच्या टिप्पणीमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचेही म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com