esakal | राफेल विमाने दाखल होताच राजनाथ सिंहांनी चीनला भरला दम!
sakal

बोलून बातमी शोधा

rajnathsingh_22.jpg

राफेल विमानांची पहिली तुकडी भारताच्या लष्करी ताफ्यात सामील झाली आहे. जगातील सर्वाधिक शक्तीशाली असणाऱ्या या लढाऊ विमानांमुळे भारताची लष्करी शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे

राफेल विमाने दाखल होताच राजनाथ सिंहांनी चीनला भरला दम!

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राफेल विमानांची पहिली तुकडी भारताच्या लष्करी ताफ्यात सामील झाली आहे. जगातील सर्वाधिक शक्तीशाली असणाऱ्या या लढाऊ विमानांमुळे भारताची लष्करी शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शत्रू राष्ट्रांना इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

भारतीय वायूदलात राफेल विमाने सामील झाली आहेत. भारतीय वायूदलाच्या वाढलेल्या क्षमतेमुळे कुणाला काळजी करण्याची किंवा घाबरण्याची गरज असेल, तर ती आमच्या देशाच्या भूभागाला धोका निर्माण करु पाहणाऱ्यांनी, असं म्हणत त्यांनी नाव न देता चीनला दम भरला आहे. पक्षी सुरक्षितपणे अंबाला हवाई तळावर उतरले आहेत. राफेल लढाऊ विमानाच्या समावेशाने भारतीय लष्कराच्या इतिहासात नये युग सुरु होणार आहे. राफेल वायूदलाच्या क्षमतेत क्रांतीकारक बदल घेऊन येईल, असंही सिंह म्हणाले.

राफेल पहिल्यांदा उतरलं त्या एअरबेसची युद्धांमध्ये महत्वाची भूमिका, जाणून घ्या...
भारतीय वायू दलांच्या जवानांचे मी अभिनंदन करतो. राफेल लढाऊ विमानांचा 17 स्क्वॅड्रोन, गोल्डन अॅरो मध्ये समावेश करण्यात येत आहे. मी अत्यंत खूश आहे वेळेवर वायूदलाची क्षमता वाढली आहे. मी फ्रान्स सरकारचे आभार मानतो. कोरोना महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असताना फ्रान्स सरकार आणि डेसॉल्ट कंपनीने आम्हाला वेळेवर विमाने पुरवली आहेत, असं सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राफेल विमानांची खरेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाली. खूप काळापासून राफेल खरेदीचा करार प्रलंबित होता. पण पंतप्रधानांच्या धाडस आणि चिकाटीमुळे आज राफेल विमाने आपल्याला मिळाली आहेत. राफेलमध्ये अनेक लष्करी वैशिष्ठे आहेत. देशावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी ही विमाने सक्षम असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

दरम्यान, सात हजार किलोमीटरचं अंतर कापून पाच राफेल विमाने आज भारतात पोहोचली. फ्रान्समधून उड्डान केलेली राफेल लढाऊ विमाने दुपारी हरियाणातील अंबाला येथे उतरली. हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया विमानांच्या आगमनावेळी अंबाला हवाई तळावर उपस्थित आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी तब्बल 59,000 करोड रुपयांचा करार करण्यात आला होता. त्यानुसार पहिली पाच राफेल विमाने हवाईदलाच्या ताफ्यात आज दाखल झाली आहेत. राफेल विमाने भारतीय लष्करासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

व्हिडिओ: राफेलचे खास अंदाजातील स्वागत तुम्ही पाहिलं का?
पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून 10 राफेल लढाऊ विमाने देण्यात येणार होती. पण अन्य विमाने तयार नसल्यामुळे सध्या 5 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात येणार आहेत.  2 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात 10 ऐवजी 5 विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते. 

loading image