‘गुरां’च्या गटातून श्‍वान बाहेर

mizoram
mizoram

मिझोराम विधानसभेत गेल्या आठवड्यात ‘मिझोराम जनावरे कत्तल (दुरुस्ती) विधेयक २०२०’ एकमताने मंजूर करण्यात आले. यात एक अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती केली ती म्हणजे कुत्र्याचा समावेश गुरांमध्ये होत नाही. राज्यात २०१३मधील मिझोराम जनावरे कत्तल कायद्याअंतर्गत सरकारने कुत्र्याचा समावेश गुरांच्या गटात केला होता. पण यातील काही तरतुदींना पशु कल्याण मंडळाचा विरोध असल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. या कायद्यात जनावरांची जी संज्ञा नमूद केली आहे त्यात कुत्र्याला गुरांच्या गटात टाकले होते. याला काही जणांचा विरोध असल्याने कायद्यात दुरुस्ती केल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय मंत्री के. बिछुआ यांनी विधानसभेत दिली. 

मिझोराममधील काही जमातींमध्ये कुत्र्याच्या मांसाचा आहारात समावेश केला जातो. मुळात अापल्या देशात मांसाहारासाठी कुत्र्यांना मारणे बेकायदा आहे. पण ईशान्य भारतातील मिझोराम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांत काही जमातींमध्ये कुत्र्यांच्या मांसाचा आहारात समावेश केला जातो. तेथे कत्तल करण्यासाठी कुत्र्यांची वाहतूक अवैधरीत्या होत असते. आता ‘मिझोराम जनावरे कत्तल (दुरुस्ती) विधेयक २०२०’ नुसार कुत्र्यांच्या कत्तलीवर उपाय निघण्याची शक्यता आहे. मिझोराममध्ये काही जमातींत कुत्र्यांचे मांस खाल्ले जात असल्याने  तेथे कुत्र्यांचा अवैध व्यापार सुरु असतो. याविरोधात ‘ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया’ (एचएसआय)या संस्थेने आवाज उठविलेला आहे. या संस्थेने २०१८ मध्ये मुंबईतून ३६ कुत्र्यांची कत्तलीपासून सुटका केली आहे. अत्यंत क्रूरपणे कुत्र्यांची वाहतूक केली जात असल्याचे ‘एचएसआय’ने म्हटले होते.

मिझोराममधील ‘ऐझॉल डॉग मिट सेलर असोसिएशन’ने याविरोधात केलेली याचिका ऐझॉल जिल्हा न्यायालयाने त्या वेळी फेटाळली होती. चीन, कोरिया, जपानसारख्या विकसित देशांतही कुत्र्यांच्या मांसाचा आहारात  समावेश केला जातो. मिझोराममध्येही अनेकांचे ते अन्न असून त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही, असे या संघटनेचा दावा होता.
एकूणच कुत्र्याचे मांस खावे का खाऊ नये, हा वादाचा मुद्दा असला तरी काही मिझो जमातींच्यादृष्टिने त्यात काहीही वावगे नाही. कायद्याने बंदी आणली तरी अवैधरीत्या होणारी कुत्र्यांची वाहतूक रोखण्यासाठी भारतात प्राणी संरक्षणासाठीचा कायदा अधिक सक्षम हवा, अशी प्राणिमित्रांची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com